शैक्षणिक

🎓 राज्यात १२ हजारांहून अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त; पीएच.डी., नेट-सेट पात्र तरुण वंचित

More than 12000 professor positions vacant in the state


By nisha patil - 6/10/2025 11:33:27 AM
Share This News:



राज्यात एका बाजूला पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे उच्च शिक्षण क्षेत्रात प्राध्यापकांच्या तब्बल १२ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. अनेक पीएच.डी., नेट व सेट पात्र उमेदवार वर्षानुवर्षे भरतीची वाट पाहत असून, अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक तासिका तत्त्वावर किंवा कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत.

राज्यातील ११ सार्वजनिक विद्यापीठे आणि १,१७२ अनुदानित महाविद्यालयांमध्ये एकूण ३३,७६३ प्राध्यापक पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त २१,२३६ पदांवर प्राध्यापक कार्यरत असून, १२,५२७ जागा रिक्त आहेत. गेल्या पाच वर्षांत फक्त २,०८८ पदांचीच भरती करण्यात आली आहे.

उच्च शिक्षण विभागाने ४,३०० प्राध्यापक पदे भरण्यासाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला असला तरी, अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पुन्हा एकदा रखडलेली आहे.

शासनाने लागू केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीसाठी पुरेसे प्राध्यापक आवश्यक आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांमुळे या धोरणाच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन यांनी सांगितले की,

“गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची भरती होत नाही. नेट, सेट आणि पीएच.डी. पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, तसेच यूजीसीच्या नियमांनुसार भरती प्रक्रिया लवकर सुरू करावी.”

तर प्रशांत शिरगूर, राज्य उपाध्यक्ष, प्राध्यापक भरती संघटना यांनी सांगितले की,

“मानधनावर किंवा तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना आपल्या हक्काची नोकरी मिळावी, यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा.”


🎓 राज्यात १२ हजारांहून अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त; पीएच.डी., नेट-सेट पात्र तरुण वंचित
Total Views: 36