बातम्या
पौर्णिमेनिमित्त अक्कोळ येथे आई रेणुका देवीचा नेवेद्य सोहळा उत्साहात
By Administrator - 12/16/2025 3:46:07 PM
Share This News:
पौर्णिमेनिमित्त अक्कोळ येथे आई रेणुका देवीचा नेवेद्य सोहळा उत्साहात
अक्कोळ (जि. बेळगाव | ता. निपाणी) : पौर्णिमेच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून अकोळ येथे आई रेणुका देवीसाठी पारंपरिक नेवेद्य अर्पण करण्याचा धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात पार पडला. आंबील, घुगऱ्या तसेच भाजी-भाकरीचा नेवेद्य महादेव पुणेकर उर्फ देवमामा यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
या सोहळ्यासाठी भाविकांनी विशेषतः आंबील, घुगऱ्या, भाजी-भाकरीसह कुरड्या, पापड आदी पदार्थांचा नेवेद्य श्रद्धेने तयार करून आणला होता. या नेवेद्याने आई रेणुका देवीचे तोंड गोड करण्याची परंपरा असून, त्यामागे भक्तांची दृढ श्रद्धा आणि आस्था असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान महादेव पुणेकर उर्फ देवमामा यांनी विधीवत पूजा करून आई रेणुका देवीची ओटी भरली. त्यानंतर व्यवस्थापक शिवाजी पुणेकर यांच्या हस्ते नेवेद्य व कापूर दाखवून उपस्थित भाविकांमध्ये प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला रेणुका माता देवस्थान समितीचे सर्वेसर्वा महादेव पुणेकर उर्फ देवमामा, व्यवस्थापक शिवाजी पुणेकर, पश्चिम महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विकास पुणेकर, महादेव नाईक, संजीवनी खोडे, सिंधू भोसले, सखूबाई पिसाळींन, प्रकाश पाटील, संजय पाटील, युवराज बचनकर, बाळासाहेब तोडकर, देवराज पाटील यांच्यासह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या धार्मिक उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये एकोप्याची भावना अधिक दृढ झाली असून, आई रेणुका देवीच्या कृपेने सर्वांचे कल्याण होवो, अशी भाविकांनी प्रार्थना व्यक्त केली.
पौर्णिमेनिमित्त अक्कोळ येथे आई रेणुका देवीचा नेवेद्य सोहळा उत्साहात
|