बातम्या
विधीमंडळात सभापतीपदी आपल्या लेकाचं कामकाज पाहायला आई; भामाबाई शिंदेंचा नऊवारीतील अभिमानाचा क्षण!
By nisha patil - 7/16/2025 7:35:29 PM
Share This News:
विधीमंडळात सभापतीपदी आपल्या लेकाचं कामकाज पाहायला आई; भामाबाई शिंदेंचा नऊवारीतील अभिमानाचा क्षण!
सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या विधिमंडळात एक अनोखा आणि भावनिक क्षण पाहायला मिळाला. विधानपरिषद सभापती राम शिंदे यांची आई भामाबाई शिंदे खास आपल्या लेकाचं कामकाज पाहण्यासाठी विधीमंडळात दाखल झाल्या. नाकात नथणी, अंगावर पारंपरिक इरकलचं नऊवारी लुगडं नेसून सभागृहात आल्यावर सर्व कॅमेरे आपसूकच या मातोश्रींकडे वळले.
आपल्या लेकाला सर्वोच्च पदावर काम करताना पाहून भामाबाई शिंदेंचा ऊर अभिमानाने भरून आला होता. पत्रकारांच्या विनंतीवरून त्यांनी आपली अस्सल मराठमोळी पोझही दिली आणि उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्यासोबतचे सहकारी त्यांना सभागृहात घेऊन गेले.
राम शिंदे यांनी याआधी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतीपदाची सूत्रे हाती घेतली होती. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली होती आणि तेव्हाही त्यांनी आपल्या आईंना पंतप्रधान कार्यालयात नेले होते.
या भावनिक प्रसंगावर विरोधी आमदार रोहित पवार यांनीही कौतुकाची पोस्ट केली आहे. “राम शिंदे हे माझे राजकीय विरोधक आहेत, पण आपल्या मुलाला सर्वोच्च पदावर पाहण्यासाठी आलेल्या त्यांच्या मातोश्रींचा अभिमान नक्कीच उरात मावत नसेल. आपली संस्कृती आणि परंपरा जपणारी ही पिढी आजच्या पिढीसाठी आदर्शवत आहे,” असे म्हणत रोहित पवार यांनी भामाबाई शिंदेंना दंडवत करत त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
विधीमंडळातील राजकारणातला हा प्रेमाचा आणि संस्कृतीचा सोहळा सर्वांनाच भावून गेला आहे.
विधीमंडळात सभापतीपदी आपल्या लेकाचं कामकाज पाहायला आई; भामाबाई शिंदेंचा नऊवारीतील अभिमानाचा क्षण!
|