बातम्या
*आजरा आंबोली महामार्गावर कुत्रे आडवे आल्याने मोटरसायकलचा अपघात
By nisha patil - 11/18/2026 12:06:08 AM
Share This News:
*आजरा आंबोली महामार्गावर कुत्रे आडवे आल्याने मोटरसायकलचा अपघात
*बाप लेक जखमी तर प्रसंगावधान साधत टेम्पो चालकांनी केली मदत
*आजरा(हसन तकीलदार):- आजरा आंबोली मार्गावर आजरा पोलीस स्टेशनच्या बरोबर समोर दि. 17 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी दहाच्या सुमारास मोटरसायकलच्या आडवे कुत्रे आल्याने अपघात घडला. या अपघातात बाप मुलगी जखमी झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी राजू आगा यांनी सांगितले.
हाती आलेल्या माहितीनुसार वाटंगीतील अर्जुन नांदवडेकर हे आपल्या मुलीला वेळवट्टीला सोडण्यास मोटरसायकल वरून जात असताना आजरा पोलीस स्टेशनच्या समोर भटक्या कुत्र्यांचा कळप आडवा आल्याने मोटर सायकल घसरून अर्जुन नांदवडेकर व त्यांची मुलगी रस्त्यावर पडले. रस्त्यावर आपटल्याने अर्जुन नांदवडेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
तसेच त्यांच्या मुलीलादेखील मार लागला असून अर्जुन नांदेडकर पडल्या ठिकाणीच बेशुद्ध अवस्थेत पडले होते. प्रसंगावधान साधून त्यांच्या मदतीला आजरा तालुका टेम्पो असोसिएशनचे अध्यक्ष राजू आगा तसेच असोसिएशनचे सदस्य रहीम काकतिकर,मुक्तार शेख,इरफान लमतुरे,अक्रम पठाण, वसीम गडकरी,बिलाल मुल्ला धावून गेले. कोणताही विलंब न करता नगरसेवक आसिफ सोनेखान व राजू आगा यांनी तातडीने रुग्णवाहिकेला कॉल करून ग्रामीण रुग्णालय,आजरा येथे घेऊन गेले व तेथून त्यांना गंभीर दुखापत झाल्याकारणाने उपजिल्हा रुग्णालय,गडहिंग्लज येथे हलवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी बोलताना राजू आगा म्हणाले की,आजरा गावातील सर्व नागरिकांची एकच विनंती आहे या भटक्या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांचा जीव प्रिय आहे पण माणसाच्या जीवाची काहीच किंमत नसल्यासारखे वाटते.कुत्र्यांच्यामुळे अपघात होऊन घरच्या कमवत्या माणसांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे त्यांचे घर उध्वस्त झाले आहे. नको त्या धोरणामुळे भटक्या कुत्र्यांचे संरक्षण होते पण माणसाचे होत नाही हेच दुर्दैव आहे. या मार्गावर उर्दू ,व्यंकटराव,आजरा हायस्कूल इ. शाळेला तसेच अंगणवाडीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा रस्ता असल्याकारणाने विद्यार्थ्यांना सुद्धा खूप मोठा धोका आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
प्रशासनाला विनंती आहे की, लवकरात लवकर यावर उपाय आखावेत. संघटना निवेदने देतात. प्रसारमाध्यमे बातम्या देतात परंतु प्रशासन जर जागे होत नसेल तर प्रशासनाला जागे करण्यासाठी काहीतरी उपाय शोधलेच पाहिजे असेही मत यावेळी राजू आगा यांनी व्यक्त केले.
*आजरा आंबोली महामार्गावर कुत्रे आडवे आल्याने मोटरसायकलचा अपघात
|