ग्रामीण

शेंडूरमध्ये मोहरम उत्सवात हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश

Muharram Festival in Shendur Reflects Hindu Muslim Unity


By nisha patil - 6/26/2026 11:37:45 AM
Share This News:



कागल | प्रतिनिधी : अजित बोडके  : 

कागल तालुक्यातील शेंडूर येथे गुरुवार (२५ जून) रोजी मोहरम उत्सव पारंपरिक धार्मिक विधी, श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात गावातील सर्व तरुण मंडळे, ज्येष्ठ नागरिक तसेच हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संपूर्ण गावात बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि एकतेचे वातावरण पाहायला मिळाले.

हजरत इमाम हुसेन यांनी करबला येथे सत्य, न्याय आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ मोहरम साजरा केला जातो. त्यांच्या त्यागाला अभिवादन करण्यासाठी मुस्लिम समाजासह अनेक हिंदू बांधवही श्रद्धेने सहभागी होत असल्याची परंपरा शेंडूरमध्ये आजही कायम आहे.

मोहरमनिमित्त ताजिया (सवारी) उभारणी, पारंपरिक धार्मिक विधी आणि विविध कार्यक्रमांमध्ये सर्वधर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक नागरिकांनी नवस फेडत सवारीचे दर्शन घेतले. गावातील नागरिकांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून हा उत्सव साजरा करत सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण केला.

मोहरम हा केवळ धार्मिक उत्सव नसून हिंदू-मुस्लिम ऐक्य, परस्पर सन्मान, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याचा संदेश यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला. शांतता, सौहार्द आणि परस्पर विश्वास जपत शेंडूरमध्ये मोहरम उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


करबला स्मरणार्थ शेंडूरमध्ये मोहरम उत्सव शांततेत आणि उत्साहात संपन्न
Total Views: 16