बातम्या
बहुविद्याशाखीय ज्ञानार्जन ही शैक्षणिक गरज – कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
By nisha patil - 11/9/2025 3:20:02 PM
Share This News:
बहुविद्याशाखीय ज्ञानार्जन ही शैक्षणिक गरज – कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
कोल्हापूर, दि. १० सप्टेंबर – “आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय ज्ञानार्जन ही आजच्या शैक्षणिक व्यवस्थेची महत्त्वाची गरज असून शिक्षक, विद्यार्थी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांनी त्यासाठी तयार असले पाहिजे,” असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्त्र अधिविभाग (स्वायत्त) आणि सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ब्रिजिंग ट्रॅडिशन अँड मॉडर्निटी: रिथिंकिंग नॉलेज इन ह्युमॅनिटीज अँड कॉमर्स” या आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय ई-परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पारंपरिक व आधुनिक ज्ञान यांचा संगम करण्याचा प्रयत्न आहे. विज्ञान, वाणिज्य आणि मानव्यशास्त्र यांचा मेळ घालून भारतीय ज्ञान प्रणालीच्या माध्यमातून बहुविद्याशाखीय शिक्षणाचा पाया मजबूत करणे हे काळाचे भान आहे.”
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी डिजिटल ह्युमॅनिटीच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, अर्थशास्त्र, कौशल्य आणि उद्योजकता यामध्ये बदल घडवून आणण्याच्या शक्यता अधोरेखित केल्या. तर डॉ. महादेव देशमुख यांनी भारताची अर्थव्यवस्था “२०२७ पर्यंत पाच ट्रिलीयन डॉलर आणि २०३० पर्यंत सात ट्रिलीयन डॉलर इतकी होऊन जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता आहे” असे सांगितले.
या परिषदेत अमेरिका, श्रीलंका, नेपाळ, मलेशिया, नायजेरिया यांसह भारतातील २३० संशोधक सहभागी झाले. एकूण २५० शोधनिबंधांपैकी निवडक १८ सादर करण्यात आले. डॉ. प्रवीण सप्तश्रृंगी (अमेरिका), डॉ. मदन मोहन गोयल, डॉ. अनुराग श्रीवास्तव (मलेशिया), डॉ. मुंथर मोहम्मद इब्राहिम (पॅलस्टाईन) आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
बहुविद्याशाखीय ज्ञानार्जन ही शैक्षणिक गरज – कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
|