विशेष बातम्या
मुंबई हादरली! १७ मुलांना ओलीस ठेवून एअर गनने गोळीबार; पोलिसांनी ठार केला अपहरणकर्ता
By nisha patil - 10/31/2025 12:21:07 PM
Share This News:
मुंबई :- मुंबईतील पवई परिसरात गुरुवारी ‘A Thursday’ या चित्रपटातील प्रसंगांची आठवण करून देणारा खळबळजनक प्रकार घडला. ऑडिशनच्या नावाखाली राज्यातील विविध भागांतून आलेल्या १५ वर्षांखालील १७ मुलांसह एकूण २० जणांना ओलीस ठेवण्यात आले. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आणि सर्व ओलीसांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.
कॉल आला आणि सुरू झाली थरारक सुटका मोहीम
गुरुवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आलेल्या एका कॉलने खळबळ उडाली. कॉल करणाऱ्याने पवईतील प्रसिद्ध आर. ए. स्टुडिओ येथे काही मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती दिली. तातडीने पवई पोलिस व विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले.
आर. ए. स्टुडिओत १० ते १२ वर्षे वयोगटातील ९ मुली, ८ मुले, २ महिला आणि १ पुरुष यांना ऑडिशनच्या नावाखाली बोलावून ओलीस ठेवण्यात आले होते. आरोपीची ओळख रोहित आर्या (वय ५०) अशी झाली आहे.
⚡ बाथरूमच्या खिडकीतून पोलिसांची एंट्री, गोळीबारात आरोपी ठार
पोलिसांनी आर्याशी चर्चा सुरू केली. मात्र, चर्चेतून काहीच निष्पन्न न झाल्याने दुसऱ्या पथकाने बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश केला. तेव्हाच आरोपीने एअर गनने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार करत त्याला जखमी केले.
जखमी अवस्थेत त्याला जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
🧒 सर्व मुलांची सुखरूप सुटका; पालकांच्या ताब्यात सुपूर्द
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी परिसर सील केला होता आणि नागरिकांच्या हालचालींवर तात्पुरती बंदी घातली. सर्व १७ मुलांसह २० ओलीसांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
❓ कोण होता रोहित आर्या? काय होती त्याची मागणी?
रोहित आर्या याने काही दिवसांपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानातील *‘पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पा’*संबंधी २ कोटींहून अधिक रक्कम परत न केल्याचा आरोप केला होता.
त्याने काही शाळांना जाणीवपूर्वक चुकीचे गुण देऊन विजेते ठरवण्यात आल्याचा गंभीर आरोपही केला होता. या प्रकरणात तो तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर अनेकवेळा उपोषणास बसला होता.
🔍 एअर गन आणि रसायन जप्त
घटनास्थळावरून पोलिसांना एअर गन आणि काही संशयास्पद रासायनिक पदार्थही आढळले आहेत. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध घेतला जात आहे.
मुंबई हादरली! १७ मुलांना ओलीस ठेवून एअर गनने गोळीबार; पोलिसांनी ठार केला अपहरणकर्ता
|