बातम्या
घरफाळा थकवणाऱ्यांना महापालिकेचा दणका! दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी बंद!
By nisha patil - 10/24/2026 2:10:24 PM
Share This News:
घरफाळा थकवणाऱ्यांना महापालिकेचा दणका! दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी बंद!
घरफाळ्याची थकबाकी न भरणाऱ्या मिळकतधारकांविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेत दोन गाळे सील करण्यात आले, तर पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित करण्यात आले. याचवेळी थकीत घरफाळ्यापोटी ३ लाख ३५ हजार रुपये वसूल करण्यात आले.महापालिकेच्या घरफाळा विभाग आणि उपद्रव शोध पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. विभागीय कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत छत्रपती ताराराणी मार्केट परिसरातील कसबा बावडा येथील गोळीबार मैदान परिसरात लघु दशरथ बुचडे यांच्या दोन गाळ्यांवर कारवाई करून ते सील करण्यात आले. या गाळ्यांची एकूण थकबाकी १ लाख २२ हजार १८० रुपये आहे.
तसेच विभागीय कार्यालय क्रमांक १ अंतर्गत गांधी मैदान विभागाच्या पथकाने जवाहरनगर, सुभाषनगर, साळोखेपार्क आणि रविवार पेठ परिसरात कारवाई केली. यामध्ये तीन वाणिज्यिक आणि दोन निवासी अशा एकूण पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित करण्यात आले.महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, उपआयुक्त परितोष कंकाळ आणि करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. कर अधीक्षक अर्चना प्रभावळे, दत्तप्रसाद माजगावकर, लिपिक सागर सुतार, सुदर्शन घाटगे आणि उपद्रव शोध पथकातील जवानांनी कारवाईत सहभाग घेतला.
घरफाळ्याची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने कारवाई तीव्र केली असून, थकबाकीदार मिळकतधारकांनी आपला कर वेळेत भरावा, असा स्पष्ट संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.
घरफाळा थकवणाऱ्यांना महापालिकेचा दणका! दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी बंद!
|