बातम्या
कोल्हापुरात अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेचा दणका! सात व्यावसायिकांना नोटिसा!
By nisha patil - 11/18/2026 3:08:19 PM
Share This News:
कोल्हापुरात अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेचा दणका! सात व्यावसायिकांना नोटिसा!
कोल्हापूर शहरात विनापरवाना होर्डिंग्ज लावणाऱ्या व्यावसायिकांविरोधात महापालिकेच्या इस्टेट विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील भाऊसिंगजी रोड, नागाळा पार्क आणि शाहूपुरी परिसरात राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत कायमस्वरूपी लोखंडी स्ट्रक्चर उभारून विनापरवाना होर्डिंग्ज लावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी घाटगे इस्टेट डेव्हलपर्स, एस.एस. रिटेल, सरोज एजन्सी, मलबार गोल्ड अँड डायमंड्स, योगीराज मोबाईल, सांगावकर जंबो कलर झेरॉक्स आणि दामोदर शिवराम अँड कंपनी या सात व्यावसायिकांना महापालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
महानगरपालिका क्षेत्रात होर्डिंग्ज किंवा एलईडी स्क्रीन लावण्यासाठी इस्टेट विभागाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, कोणतीही परवानगी न घेता लोखंडी स्ट्रक्चर उभारण्यात आल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शहरातील सर्व होर्डिंग्जधारकांनी अनधिकृत होर्डिंग्ज आणि एलईडी स्क्रीन स्वतःहून हटवावेत किंवा नियमित परवानगी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. अन्यथा अनधिकृत होर्डिंग्ज आणि एलईडी स्क्रीन जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त किरण धनवाडे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे आणि पथकाने ही कारवाई केली आहे.
कोल्हापुरात अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेचा दणका! सात व्यावसायिकांना नोटिसा!
|