राजकीय

राजारामपुरीत महापालिकेची धडक कारवाई; ७ हातगाड्या जप्त, अनधिकृत शेड्स हटवले

Municipal Corporation takes drastic action in Rajarampuri


By nisha patil - 6/5/2026 11:22:09 AM
Share This News:



राजारामपुरीत महापालिकेची धडक कारवाई; ७ हातगाड्या जप्त, अनधिकृत शेड्स हटवले

 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. ३ (राजारामपुरी) व अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज राजारामपुरी पहिली गल्ली परिसरात धडक कारवाई करत खाऊच्या गाड्या हटवून परिसर मोकळा केला. या कारवाईत ७ हातगाड्या जप्त करण्यात आल्या, तर ४ दुकानांवरील अनधिकृत शेड्स आणि ४ दुकानांचे अनाधिकृत कट्टे तोडून काढण्यात आले.

 

महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दुपारी राजारामपुरी जनता बाजार खाऊ गल्ली परिसराला अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा, फुटपाथवर तसेच सामासिक अंतरामध्ये करण्यात आलेले बांधकाम, सार्वजनिक जागेत उभारलेल्या टपऱ्या, खोकी व अन्य अतिक्रमणे केली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. या ठिकाणी पार्किंगसाठी राखीव जागेत कोणतेही अतिक्रमण होऊ नये, अशा सक्त सूचना उप-शहर अभियंत्यांना देण्यात आल्या. तसेच व्यावसायिकांनी स्वत:हून आपले अनधिकृत अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त जयंत जावडेकर उपस्थित होते.

 

ही कारवाई उपशहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्र.3 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या शेड्सवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असलेचे अतिक्रमण विभागाने सांगितले आहे.

 


राजारामपुरीत महापालिकेची धडक कारवाई; ७ हातगाड्या जप्त, अनधिकृत शेड्स हटवले
Total Views: 8