बातम्या
रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करून खून; पिता-पुत्रांसह तिघांना जन्मठेप
By nisha patil - 5/10/2026 11:25:52 PM
Share This News:
रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करून खून; पिता-पुत्रांसह तिघांना जन्मठेप
कोल्हापूर : २०१३ मध्ये झालेल्या खून प्रकरणाचा तब्बल १३ वर्षांनंतर निकाल लागला असून, कोल्हापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने राजेंद्र आनंद सावंत, धैर्यशील राजेंद्र सावंत आणि अभिजीत राजेंद्र सावंत या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर संतोष रामचंद्र इंगवले यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. �
२४ मे २०१३ रोजी रमणमळा पोस्ट ऑफिसजवळ किरकोळ वादातून ही घटना घडली होती. या प्रकरणात रवींद्र बाबासो गायकवाड यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, धैर्यशील सावंत आणि रवींद्र गायकवाड यांच्यात झालेल्या वादातून पुढे मारहाणीचा प्रकार घडला.
या वादातून राजेंद्र सावंत, धैर्यशील सावंत आणि अभिजीत सावंत यांनी हेमंत गायकवाड यांना मारहाण केली. त्यानंतर धैर्यशील व अभिजीत यांनी चिथावणी दिल्याने राजेंद्र सावंत याने रिव्हॉल्व्हरमधून हेमंत गायकवाड आणि त्यांचे बंधू शशिकांत गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात हेमंत बाबासो गायकवाड (वय २९) यांचा मृत्यू झाला, तर शशिकांत गायकवाड जखमी झाले.
या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 118/2013 दाखल करण्यात आला होता. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 302, 307, 323, 504, 506, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सुजाता एस. इंगळे यांनी बाजू मांडली. त्यांनी एकूण ११ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह वैद्यकीय अधिकारी, बॅलेस्टिक रिपोर्ट आणि इतर तांत्रिक पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने राजेंद्र आनंद सावंत, अभिजीत राजेंद्र सावंत आणि धैर्यशील राजेंद्र सावंत यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रत्येक आरोपीला दंडाचीही शिक्षा सुनावण्यात आली असून, दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. राजेंद्र सावंत यांना हत्यार कायद्याखालीही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृत मराठे यांनी केला. न्यायालयीन कामकाजात सरकारी वकील सुजाता एस. इंगळे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली, तर कोर्ट पैरवी अधिकारी शंकर नारायण माने यांनी काम पाहिले. तपास व न्यायालयीन कामकाजाला पोलीस निरीक्षक संतोष डोके यांचे मार्गदर्शन मिळाले.
रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करून खून; पिता-पुत्रांसह तिघांना जन्मठेप
|