बातम्या

अवघ्या ८ तासांत खुनाचे रहस्य उकलले — स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई!

Murder mystery solved in just 8 hours


By nisha patil - 10/28/2025 5:17:31 PM
Share This News:



अवघ्या ८ तासांत खुनाचे रहस्य उकलले — स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई!
 

चार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

कोल्हापूर, दि. २८ ऑक्टोबर : कबनूर (ता. हातकणंगले) येथे झालेल्या धक्कादायक खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या ८ तासांच्या आत करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी चार आरोपींना जेरबंद केले आहे. अभिनंदन जयपाल कोल्हापूरे (वय ४४) यांचा सिमेंटच्या पाईपने डोक्यावर प्राणघातक वार करून खून करण्यात आला होता.

घटनेचा तपशील :
२८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १ ते २ वाजताच्या सुमारास इंदिरा हौसिंग सोसायटी, कबनूर येथील अभिनंदन कोल्हापूरे यांना पंकज चव्हाण व त्याच्या साथीदारांनी ‘पोलीस ठाण्यात जायचे आहे’ असा बहाणा करून घराबाहेर बोलावले. त्यानंतर कबनूर-कोल्हापूर रोडवरील हिंदुस्थान पेट्रोल पंपासमोर नेऊन सिमेंटच्या पाईपने डोक्यात वार करून त्यांचा खून करण्यात आला.

फिर्यादी डॉ. अभिषेक कोल्हापूरे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ७०५/२०२५, कलम ३०२, ३४ भा.दं.सं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

तडफदार पोलिस कारवाई :
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथक तयार करून तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे चौंडेश्वरी फाटा, चिपरी (ता. शिरोळ) येथे सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली.

अटक आरोपींची नावे :
 

1️⃣ पंकज संजय चव्हाण (वय २७, रा. कबनूर)
2️⃣ रोहित जगन्नाथ कोळेकर (वय २४, रा. कागल)
3️⃣ विशाल राजू लोंढे (वय ३१, रा. इचलकरंजी)
4️⃣ आदित्य संजय पवार (वय २१, रा. इचलकरंजी)

चौकशीत त्यांनी हॉटेल वैशाली येथे झालेल्या भांडणाच्या कारणावरून सूडबुद्धीने खून केल्याची कबुली दिली. आरोपींना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत.

कारवाईत सहभागी अधिकारी :
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिष म्हेत्रे, पोलीस अंमलदार महेश खोत, महेश पाटील, अनिल जाधव, सागर चौगले, सुरेश राठोड (सायबर पोलीस ठाणे) यांच्या पथकाने केली.

पोलिसांच्या वेगवान तपासामुळे अवघ्या काही तासांत गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश — नागरिकांतून पोलीस दलाचे कौतुक!


अवघ्या ८ तासांत खुनाचे रहस्य उकलले — स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई!
Total Views: 52