बातम्या

पुणे पदवीधरवरून मुश्रीफ-माने दुरावले; भैय्या माने साथ सोडणार!

Mushrif and Mane drift apart over Pune Graduate constituency


By nisha patil - 3/10/2026 1:51:51 PM
Share This News:



पुणे पदवीधरवरून मुश्रीफ-माने दुरावले; भैय्या माने साथ सोडणार!

 

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून कोल्हापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे भैय्या माने यांनी आता मंत्री मुश्रीफ यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भैय्या माने यांनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी केली होती. मात्र उमेदवारीचा निर्णय लांबल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी वाढली. त्यातच भैय्या माने आणि माझा संबंध संपला, असे वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्याने या घडामोडींना आणखी वेग आला.

माने यांच्या समर्थकांकडून त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा आग्रह केला जात असल्याची माहिती आहे. मतदार नोंदणीची आकडेवारी वरिष्ठ नेत्यांसमोर मांडून अपक्ष उमेदवारीचा पर्याय स्वीकारावा किंवा महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग काढावा, अशा सूचनाही करण्यात आल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ या दोन्ही जागांवर भाजपने दावा केला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी दोन्ही जागा भाजप लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुणे पदवीधरची जागा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र संबंधित लाड कुटुंब आता भाजपमध्ये आल्याचा दाखला देत या जागेवर भाजपचा दावा असल्याचे महाडिक यांनी म्हटले आहे.

त्यामुळे भाजपचा दावा, माने यांच्या संभाव्य बंडखोरीची चर्चा आणि मुश्रीफ-माने यांच्यातील वाढता दुरावा... या तिन्ही घडामोडींमुळे पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सध्या कोल्हापूरच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.


पुणे पदवीधरवरून मुश्रीफ-माने दुरावले; भैय्या माने साथ सोडणार!
Total Views: 12