बातम्या

‘माझे झाड, माझा बाप्पा’ उपक्रमाला विवेकानंद कॉलेजमध्ये उत्स्फूर्त प्रारंभ

My Tree My Bappa


By nisha patil - 12/9/2026 3:28:20 PM
Share This News:



‘माझे झाड, माझा बाप्पा’ उपक्रमाला विवेकानंद कॉलेजमध्ये उत्स्फूर्त प्रारंभ
 

कोल्हापूर दि. 12 :: पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूरच्या आर्ट्स व कॉमर्स विभागातर्फे ‘माझे झाड, माझा बाप्पा’ या पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पर्यावरण शिक्षण विषयांतर्गत आयोजित या उपक्रमाची सुरुवात विभागप्रमुख सौ. शिल्पा भोसले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना झाडांची रोपे देऊन करण्यात आली.
 

पर्यावरणाची विघ्ने दूर करण्याचे कार्य केवळ झाडरूपी बाप्पाच करू शकतात, या जाणिवेतून गणेशोत्सवाच्या काळामध्ये  विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे आणि त्यांना प्रत्यक्ष कृतीस प्रवृत्त करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.  या उपक्रमाचे स्वरूप केवळ वृक्षलागवडीपुरते मर्यादित नसून वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारणे, असे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः देशी वृक्षाचे रोप लावून, झाड लावताना झाडासोबत स्वतःचा जिओटॅग फोटो काढून तो महाविद्यालयाकडे जमा करायचा आहे. तसेच लावलेल्या झाडाला नियमित पाणी देणे, त्याचे संरक्षण व संगोपन करणे आणि वेळोवेळी त्याचे छायाचित्र महाविद्यालयाकडे जमा करायचे आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या राहत्या परिसरात, रस्त्याच्या बाजूला किंवा उपलब्ध मोकळ्या जागेत इतरांना कोणताही अडथळा होणार नाही अशा योग्य ठिकाणी देशी वृक्षांची लागवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लावलेल्या झाडाचे किमान तीन वर्षे संरक्षण, संगोपन व जतन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा आहे.  यावेळी स्टाफ सेक्रेटरी श्री. यू. एच. ‍तिजाईकर, पर्यावरण विषय शिक्षक श्री. ए. आर. धस यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्र.प्राचार्य डॉ सी बी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, तर रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे यांचे सहकार्य लाभले.  विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन ‘गणपतीरूपी झाड लावू, पर्यावरणाची विघ्ने टाळू’ हा संदेश कृतीतून साकारावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


‘माझे झाड, माझा बाप्पा’ उपक्रमाला विवेकानंद कॉलेजमध्ये उत्स्फूर्त प्रारंभ
Total Views: 14