गोरगरिबांच्या रुग्णसेवेमुळेच माझा देशभर लौकिक — मंत्री हसन मुश्रीफ
“अखेरच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करीतच राहीन”
कागल, दि. १९ : “गोरगरिबांच्या रुग्णसेवेमुळे माझा लौकिक संपूर्ण देशभर वाढला आहे. जिवात जीव असेपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करीतच राहीन,” असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल येथे नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनतर्फे मुंबईत मोफत उपचार घेतलेल्या रुग्णांचा “शतायुषी व्हा...” हा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. गेल्या वर्षभरात उपचार झालेल्या अडीच हजारांहून अधिक रुग्णांनी यात सहभाग घेतला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, “जो पीडित आहे, त्याच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे. सुधारित ट्रस्ट ॲक्टमुळे आज पुणे-मुंबईतील मोठ्या दवाखान्यांमध्ये गोरगरीब रुग्णांना सन्मानाने मोफत उपचार मिळत आहेत. सीपीआर रुग्णालयाचे नूतनीकरण आणि शेंडा पार्कमध्ये उभारल्या जाणाऱ्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे आता रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “रुग्णसेवा करताना मी कधीच गट-तट, पक्ष-धर्माचा विचार केला नाही. समरजीत घाटगे यांनी रुग्ण पाठविला तरी मी त्याच तळमळीने त्याची सेवा करीन. माझ्यासाठी ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ आहे.”
हजारो चिमुकल्यांना जीवदान!
पाडळी (ता. करवीर) येथील अमर पाटील यांनी आपल्या चार वर्षांच्या मुलाच्या यशस्वी किडनी ट्रान्सप्लांटबद्दल मुश्रीफ यांचे आभार मानले आणि सांगितले की, “साहेबांनी आमच्या मुलाला आणि अशा हजारो चिमुकल्यांना साक्षात जीवदान दिले.”
कार्यक्रमात हरी नाना खतकर, चंद्रकांत चौगुले, भारती सुतार, विनायक गाडगीळ, शुभ्रा मोहीते, वजीर नायकवडी आदी रुग्णांनी अनुभव व्यक्त केले. सर्व रुग्णांना मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते फुले देऊन निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि दिवाळी फराळाचे वाटपही झाले.
व्यासपीठावर रणजितसिंह पाटील, युवराज पाटील, सूर्यकांत पाटील, चंद्रकांत गवळी, रामगोंडा (तात्या) पाटील, प्रकाशराव गाडेकर, नवल बोते, नवाज मुश्रीफ, मनोज फराकटे, अमित गाताडे, नेताजीराव मोरे, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, अमित पिष्टे, अर्जुन नाईक, विवेक लोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील (कुरुकुलीकर) यांनी केले, प्रास्ताविक विजय काळे, सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले, तर आभार संजय चितारी यांनी मानले.