राहुल व राजेश पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल
कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजित पवार यांचा दौरा यशस्वी करण्याचा निर्धार
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (दि. २५) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर होते. राहुल पाटील व राजेश पाटील यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून, पक्षप्रवेश कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड येथील पक्षाच्या कार्यालयात ही बैठक झाली. पाटील बंधूसंह कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख सहकारी संस्थांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षाला फार मोठे पाठबळ मिळणार आहे. पाटील यांचा पक्षामध्ये सन्मान राखला जाईल, असे आसुर्लेकर यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, बाजार समितीचे उपाध्यक्ष राजाराम चव्हाण, इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे, अमित गाताडे, पंडितराव केणे आदी प्रमुख उपस्थित होते. युवक जिल्हा अध्यक्ष नितीन दिंडे यांनी स्वागत केले केले. प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी प्रास्ताविक केले विश्वनाथ कुंभार यांनी आभार मानले.