विशेष बातम्या

आता मिळणार फक्त ‘अस्सल कोल्हापुरी चप्पल’; एनएफसी चिपमुळे बनावट चप्पल विक्रेत्यांना चाप

NFC chip puts a damper on fake slippers sellers


By nisha patil - 10/30/2025 11:06:37 AM
Share This News:



 कोल्हापूर:- कोल्हापुरी चप्पलचे अस्सलपण आता ओळखणे अधिक सोपे होणार आहे. क्यूआर कोड आणि एनएफसी (NFC) चिप बसवलेल्या कोल्हापुरी चप्पलमुळे ग्राहकांना आता फक्त अस्सल आणि दर्जेदार चप्पलच विकत घेता येणार आहे. या उपक्रमामुळे बनावट कोल्हापुरी चप्पल विकणाऱ्यांवर अंकुश बसणार असून, कारागिरांना जागतिक बाजारपेठेत नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

गेल्या काही वर्षांत पर्यटकांना नकली कोल्हापुरी चप्पल विकल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे खरी आणि बनावट चप्पल ओळखणे अवघड बनले होते. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चप्पलचा उगम, दर्जा आणि निर्मितीविषयीची माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे.

प्रत्येक कोल्हापुरी चप्पलमध्ये एनएफसी चिप आणि क्यूआर कोड बसवला जाणार आहे. या कोडद्वारे ग्राहक आपल्या मोबाईलवरून स्कॅन करून चप्पल कोणत्या कारागिराने तयार केली, कोणत्या ठिकाणी उत्पादन झाले, आणि त्याचा दर्जा काय आहे, ही सर्व माहिती पाहू शकतील.

या उपक्रमामुळे निर्मितीपासून विक्रीपर्यंत एक साखळी (supply chain) तयार केली जाणार आहे, ज्यामुळे ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड ‘प्राडा’ यांनी त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी डिझाइनचा वापर केला असतानाही कोल्हापूरातील कारागिरांना श्रेय दिले नव्हते. यावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने तीव्र भूमिका घेत, ‘प्राडा’ला नमते घेण्यास भाग पाडले. त्यानंतर ‘प्राडा’च्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूरात येऊन कारागिर आणि व्यापाऱ्यांची भेट घेऊन भविष्यातील करारांवर चर्चा केली.

या पार्श्वभूमीवर कोल्हापुरी चप्पल उत्पादक, कारागीर आणि व्यावसायिक यांचे संघटन मजबूत करण्यात येत आहे. तसेच ब्लॉकचेन प्रणालीचा वापर करून उत्पादन आणि विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या नव्या तंत्रज्ञानामुळे कोल्हापुरी चप्पलचा अस्सल दर्जा जागतिक पातळीवर नोंदवला जाईल आणि कारागिरांच्या मेहनतीला योग्य ओळख मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


आता मिळणार फक्त ‘अस्सल कोल्हापुरी चप्पल’; एनएफसी चिपमुळे बनावट चप्पल विक्रेत्यांना चाप
Total Views: 39