बातम्या
मार्च २०२७ पर्यंत वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण करा; विलंब झाल्यास कारवाई – हसन मुश्रीफ
By nisha patil - 5/6/2026 10:40:11 AM
Share This News:
मार्च २०२७ पर्यंत वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण करा; विलंब झाल्यास कारवाई – हसन मुश्रीफ
नंदुरबारच्या आरोग्य सुविधांना चालना; वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्याचे आदेश
गरीब व आदिवासी रुग्णांसाठी आधुनिक आरोग्य सेवा; सर्व निधी उपलब्ध करणार – मुश्रीफ
नंदुरबार : जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृहाचे बांधकाम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कामात विलंब झाल्यास संबंधित कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची पाहणी करताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रकल्पाची सविस्तर समीक्षा केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय राठोड आणि जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे उपस्थित होते.
सध्या प्रकल्पाचे सुमारे ४३ टक्के काम पूर्ण झाले असून अपेक्षित गती नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत पालकमंत्र्यांनी कामाला वेग देण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला आढावा घेऊन प्रगती अहवाल सादर करावा, तसेच कंत्राटदारांनी मनुष्यबळ वाढवून पावसाळ्यात अंतर्गत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने गरीब व आदिवासी रुग्णांना दर्जेदार व आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयासाठी १० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून वीजपुरवठ्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
मार्च २०२७ पर्यंत वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण करा; विलंब झाल्यास कारवाई – हसन मुश्रीफ
|