शैक्षणिक
शहाजी महाविद्यालयात शनिवारी पायाभूत सुविधा व संसाधन विकास यावर राष्ट्रीय परिषद
By nisha patil - 1/20/2026 3:49:21 PM
Share This News:
कोल्हापूर :- श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शनिवारी दि. 24 जानेवारी, 2026 रोजी भूगोल विभागाच्या वतीने 'भारतातील पायाभूत सुविधा व संसाधने विकास: समस्या, आव्हाने आणि दृष्टिकोन' या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरविद्याशाखीय स्वरूपाची ही परिषद असून प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांनी या परिषदेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले आहे.
परिषदेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठातील माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. बी. ककडे यांच्या हस्ते व श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग विजयराव बोंद्रे (दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या परिषदेमध्ये बीजभाषक पद शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. बी. एन. गोफणे हे भूषवणार आहेत.
या राष्ट्रीय परिषदेमध्ये विषयतज्ञ म्हणून पंजाबी विद्यापीठ, पटियाला चे डॉ. दीपक कुमार व गव्हर्मेंट कॉलेज, खंडोला मार्सेला गोवा येथील प्रो. डॉ. पी. के. रथ मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेमध्ये पायाभूत सुविधा आणि संसाधन विकास या विषयावर जर्नल स्वरूपातील पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. तसेच संशोधकांनी तयार केलेल्या संशोधन पेपरचे सादरीकरण होणार आहे.
परिषदेचा समारोप शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल आणि भूगर्भशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. एस. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या परिषदेची जबाबदारी आयोजक व भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एल. काशिद-पाटील, समन्वयक डॉ. सौ. एन. डी. काशिद-पाटील व महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर पार पाडत आहेत.
शहाजी महाविद्यालयात शनिवारी पायाभूत सुविधा व संसाधन विकास यावर राष्ट्रीय परिषद
|