कृषी
राष्ट्रीय शेतकरी दिन : अन्नदाता शेतकऱ्यांच्या कष्टांना सलाम
By nisha patil - 12/23/2025 11:34:15 AM
Share This News:
शेतकऱ्याला ‘जगाचा पोशिंदा’ असे संबोधले जाते आणि ते शब्दशः खरे आहे. शेतकरी नसेल तर मानवाच्या अस्तित्वालाच अर्थ उरणार नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यामुळेच आपल्या ताटात अन्न येते. या अन्नदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभरात दरवर्षी २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो.
हा दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे कैवारी स्वर्गीय चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. देशात शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून २००१ साली राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी समर्पित करण्यात येतो.
भारत हा कृषिप्रधान देश असून, देशातील ५० टक्क्यांहून अधिक लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच सर्वसामान्यांच्या ताटात अन्न पोहोचते.
चौधरी चरणसिंग हे स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणींची सखोल जाण होती. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आणि त्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच त्यांना शेतकऱ्यांचा खरा कैवारी मानले जाते.
राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम, चर्चासत्रे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. शेतकऱ्यांचा सन्मान करणे, त्यांच्या योगदानाची जाणीव करून देणे आणि शेतीविषयी जागरूकता निर्माण करणे हाच या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रीय शेतकरी दिन : अन्नदाता शेतकऱ्यांच्या कष्टांना सलाम
|