बातम्या
*मौजे दाभील येथे भात पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम संपन्न
By nisha patil - 9/21/2026 11:18:53 PM
Share This News:
*मौजे दाभील येथे भात पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम संपन्न
*आजरा(हसन तकीलदार):- आज दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत खरीप हंगाम भात पीक नैसर्गिक शेती शेतीशाळा कार्यक्रम मौजे दाभिल तालुका आजरा येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज पाटील(सरपंच दाभिल) उपस्थित होते.या कार्यक्रमात सौ.सुगंधा राणे (सदस्या ग्रामपंचायत दाभिल), शरद मस्कर (सदस्य तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती आजरा )यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात प्रतीक पाटील (आय.पी.एम. प्रोजेक्ट हेड, ग्रीन रिव्होल्यूशन कोल्हापूर )यांनी भात पिकावरील कीड व रोग ओळख व त्यांचे जैविक आणि नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण याबाबत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन पर भाषणात बोलताना त्यांनी भात पिकात पिवळा खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, तुडतुडे, गन्धमाशी आणि विविध प्रकारचे करपा रोग हे शेतकाऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट आणणारे मुख्य शत्रू आहेत.
या सर्व किडी व रोगांपासून पिकाचे शाश्वत संरक्षण करण्यासाठी जैविक, भौतिक आणि रासायनिक उपायांचा मेळ घालणारे एकात्मिक कीड व्यवस्थापन (आय. पी. एम.) अत्यंत प्रभावी ठरते. पिवळ्या खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी आणि सर्वेक्षणासाठी शेतात प्रति एकरी 8 ते 10 कामगंध सापळे (YSB Lure आणि Funnel Traps) पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळातच लावावेत.
कामगंध सापळ्यांमधील ल्यूरच्या (Lure) वासाने नर पतंग आकर्षित होऊन ट्रॅप मध्ये अडकतात, ज्यामुळे नर-मादीचे मिलन रोखून किडीची पुढील पिढी नष्ट होते.हे कामगंध सापळे शेतात पिकाच्या जमिनीपासून किंवा पानांच्या उंचीपासून साधारण १ फूट उंच राहतील अशा प्रकारे बांबूच्या काठीला व्यवस्थित बांधावेत.मावा, तुडतुडे आणि इतर लहान उडणाऱ्या कीटकांना आकर्षित करून मारण्यासाठी प्रति एकरी ३०ते ४०पिवळे व निळे चिकट सापळे (Sticky Traps) वापरावेत.
चिकट सापळे रोपांच्या पानांच्या रेषेत (कॅनोपीच्या पातळीवर) लावल्यास तुडतुडे व इतर रसशोषक कीटक त्यावर सहज चिकटून मरतात.करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युरियाचा अतिवापर टाळावा, पिकात पाण्याचा निचरा योग्य ठेवावा आणि बुरशीनाशक बीजप्रक्रिया आवर्जून करावी.किडींच्या सुरुवातीच्या टप्प्यात निंबोळी अर्क (५%) किंवा ट्रायकोग्राम (Trichogramma) मित्रकीटकांचे कार्ड वापरून जैविक नियंत्रणावर भर द्यावा.शेवटी किडीची आर्थिक नुकसान पातळी (ETL) ओलांडल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच योग्य कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करून भाताचे भरघोस उत्पन्न मिळवावे, असे सांगितले.तसेच शेतकऱ्यांचे शंका समाधान केले.
अमित यमगेकर( सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा )यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रगतशील शेतकरी नंदकुमार वाजे यांनी आभार मानले. यावेळी जनार्दन पाटकर, रणजीत कदम, अरुण पाटील, पुनम गायकवाड, सुधा कांबळे आदी शेतकरी उपस्थित होते.
*मौजे दाभील येथे भात पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम संपन्न
|