बातम्या
वडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूक
By nisha patil - 1/6/2025 12:56:50 AM
Share This News:
वडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूक
गोकुळ दूध संघाचे नवे अध्यक्ष म्हणून नवीद मुश्रीफ यांची निवड — मंत्री हसन मुश्रीफ यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन
कागल,:गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नवीद मुश्रीफ यांनी आज सकाळी वडील आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांना मिठी मारून त्यांच्या आशीर्वाद घेतले. वडिलांच्या मिठीत शिरताच नवीद भावूक झाले. डोळ्यांत अश्रू तरळले, पण चेहऱ्यावर समाधान झळकत होते.
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सुपुत्र नवीद यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना त्यांना गोकुळच्या भविष्यातील कारभाराबाबत मोलाचे मार्गदर्शन दिले.
“गोकुळ दूध संघ म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांचे श्रममंदिर आहे. पहाटेपासून शेतकरी माता-भगिनी शेण-मुतात हात घालून जी मेहनत घेतात, तिचा आदर ठेवून, पारदर्शकतेने आणि काटकसरीने काम करा,” असे मंत्री मुश्रीफ यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
ते पुढे म्हणाले,
“सभासद म्हणजेच शेतकरीच या संघाचे खरे मालक आहेत. आपण फक्त विश्वस्त आहोत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम करा.”
नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर भावनिक क्षण
निवडीनंतर नवीद मुश्रीफ यांनी वडिलांना मिठी मारताच संपूर्ण वातावरण भावनांनी भरून गेले. उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही उत्साह होता. गोकुळ अध्यक्षपदासाठी नवीद यांचे नाव निश्चित होणे हे “हतबलतेचे” प्रतीक असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन – मंत्री मुश्रीफ यांचे आभार
गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगत मंत्री मुश्रीफ म्हणाले,
“ही निवड म्हणजे माझी हतबलता होती. पण गेली ३५-४० वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गोरगरिबांप्रती असलेली साफ नियत, दानत आणि कठोर परिश्रम, हीच माझी पुण्याई आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी नवीद मुश्रीफ यांनी वडील हसन मुश्रीफ यांना पाया पडत त्यांचा आशीर्वाद घेतला. कागलच्या घरासमोरील मंडपात कार्यकर्त्यांच्या गर्दीत हा भावनिक क्षण अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला.
वडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूक
|