शैक्षणिक
विकसित भारतासाठी शिक्षण, संशोधनासह गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची गरज
By nisha patil - 1/24/2026 3:39:24 PM
Share This News:
विकसित भारतासाठी शिक्षण, संशोधनासह गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची गरज
शहाजी महाविद्यालयात ‘भारताची पायाभूत सुविधा व संसाधने : समस्या, आव्हाने व दृष्टिकोन’ या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न
कोल्हापूर : विकसित भारताच्या संकल्पनेत शिक्षण, संशोधनासह सर्व क्षेत्रांमध्ये गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांचा समतोल विकास आवश्यक असून, त्याकडे दुर्लक्ष झाल्यास विकास एकांगी ठरेल, असे ठाम प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. व्ही. बी. ककडे यांनी केले.
दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने आयोजित ‘भारताची पायाभूत सुविधा व संसाधने : समस्या, आव्हाने व दृष्टिकोन’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिषद उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण अध्यक्षस्थानी होते.
संशोधन व शिक्षणाकडे दुर्लक्ष चिंताजनक
डॉ. ककडे म्हणाले की, भारत ही जागतिक स्तरावर मोठी बाजारपेठ असून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. रस्ते, लोहमार्ग, विमान वाहतूक आदी क्षेत्रांत वेगाने प्रगती होत असली तरी शिक्षण व संशोधनाकडे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे. मंदिरांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असताना, शिक्षण संस्था व शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी अपेक्षित निधी मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
विकासाची फळे सामान्य व तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, अन्यथा विकासाचा उद्देशच अपूर्ण राहील, असेही ते म्हणाले. चीनमधील १७ विद्यापीठे जागतिक क्रमवारीत पहिल्या हजारात असताना, भारतातील एकही विद्यापीठ त्या यादीत नसणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. शिक्षण व संशोधनच विकासाची दिशा ठरवू शकते, या दृष्टीने धोरणकर्त्यांनी विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विकास व पायाभूत सुविधांचा समन्वय आवश्यक
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले की, सर्व नागरिकांना नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हाच खरा विकास आहे. विकास आणि पायाभूत सुविधांची सांगड कशी घालायची, यावर नव्याने विचार करण्याची गरज असून, त्याच उद्देशाने या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
मानवकेंद्रित विकासावर भर
पंजाबच्या पटियाला येथील पंजाबी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. दीपक कुमार यांनी विकासाचा प्राधान्यक्रम ठरवणे महत्त्वाचे असून विकास मानवकेंद्रित असावा असे मत व्यक्त केले. स्थानिक संसाधने व मानवी शक्तीचा योग्य उपयोग केल्यासच खऱ्या अर्थाने विकास साध्य होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
गोवा येथील गव्हर्नमेंट कॉलेजचे प्राध्यापक डॉ. रथ यांनी भारतातील सध्याच्या पायाभूत विकासाची माहिती सादर केली.
संशोधन पेपर सादरीकरण व ग्रंथ प्रदर्शन
कार्यशाळेचे उद्घाटन वृक्षारोपण व जलार्पणाने करण्यात आले. यावेळी संशोधकांनी सादर केलेल्या संशोधन पेपरच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
भूगोल विभागप्रमुख डॉ. डी. एल. काशीद-पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. ऐश्वर्या हिंगमिरे व डॉ. सारिका कांबळे यांनी केले. परिषदेसाठी डॉ. नीता काशीद-पाटील, प्रा. शुभम पाटील, प्रा. गौरव काटकर, प्रा. प्रतिमा शिंदे यांनी संयोजन केले.
समारोपप्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल व भूगर्भशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. एस. जाधव व डॉ. ए. आर. चौगुले उपस्थित होते. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा येथील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांनी परिषदेत सहभाग नोंदवला.
यावेळी शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने भूगोल विषयक संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन तसेच पायाभूत विकास या संकल्पनेवर आधारित भिंतपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विकसित भारतासाठी शिक्षण, संशोधनासह गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची गरज
|