ताज्या बातम्या
नगरपंचायतीच्या नियोजनशून्य करभारावर नूतन नगरसेवक आक्रमक
By nisha patil - 11/2/2026 3:55:51 PM
Share This News:
नगरपंचायतीच्या नियोजनशून्य करभारावर नूतन नगरसेवक आक्रमक
आजरा(हसन तकीलदार):- नगरपंचायतीची पहिली तहकुब झालेली सभा अशोकअण्णांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी अधिकाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत नूतन नगरसेवकांनी आपली आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी नगरसेवक असिफ सोनेखान, असिफ पटेल, अभिषेक शिंपी, निसार लाडजी, बामणे भाऊजी यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत विविध विषयावर चर्चा करीत सूचना मांडल्या.

यामध्ये प्रामुख्याने अमृतजल योजनेची पोलखोल करण्यात आली. जवळपास दोन ते तीन वर्षे रेंगाळलेली नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे आजरा वासीय पुरतेच वैतागले आहेत. वारंवार होणारी खुदाई, नियोजन शून्य कामकाज यामुळे खड्डे, चिखल आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे आणि अधिकाऱ्यांच्या उदासीन कार्यप्रणालीमुळे अनेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर काही ठिकाणी रात्रंदिवस पाणी सोडले जात असल्याने रस्त्यावर आणि गटारीना पाण्याचे लोट वाहताना दिसत आहे. हजारो लिटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाला याबद्दल सांगितले तरी याची दखल घेतली जात नाही.
पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराचे पुढचे देणेदेखील सभागृहात चर्चा झाल्याशिवाय देण्यात येऊ नये त्याचप्रमाणे ठेकेदाराने रस्ता खुदाई करून केलेले पॅचवर्क म्हणजे या योजनेतील मोठा भ्रष्टाचार आहे. रस्ते करणारच असाल तर पॅचवर्कचा अतिरिक्त खर्च कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करीत रस्त्याचे पॅचवर्क तातडीने थांबवावेत अशी सूचना नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी पाणी पुरवठा योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी पुरवठा योजनेचा ठेकेदार नगरसेवकांच्या बरोबर सभ्य भाषा वापरत नसल्याने त्याने सभागृहासमोर माफी मागावी व योजनेचा संपूर्ण आराखडा सभागृहासमोर मांडावा अशी मागणी करण्यात आली.
आठवडा बाजाराचा जमा होणारा कर व लिलाव यामध्ये तफावत असल्यामुळे येणारा लिलाव अभ्यास करूनच रक्कम ठरवण्याबाबतची सुचना नगरसेविका स्मिता कुंभार यांनी मांडली.
लाखो रुपये खर्च करून जर कचरा वेळेत उचलला जात नसेल तर एखाद्या कंपनीला कचरा उचलण्यासाठी ठेका देण्याऐवजी ही यंत्रणा नगरपंचायतिमार्फत राबविता येते का याची चाचपणी करण्याची सूचना नगरसेवक परशुराम बामणेभाऊजी यांनी केली.
चारवर्षे क्रीडा संकुलाची इमारत बांधूनही अद्याप वापरात नाही ती वापरात आणणे गरजेचे असल्याचे सभेत सुचवण्यात आले. बांधकाम परवाना देताना व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना पैशाची मागणी होत असल्याचा आरोप यावेळी नगरसेवक परेश पोतदार यांनी केला.
याबरोबरच नगरपंचायत दुकान गळ्यांची भाडेवाढ, पे अँड यूज तत्वावर असलेली स्वछता गृहे खुली करावीत, आठवडा बाजार ठेक्याची किमान लिलाव रक्कम विस लाख रु. करावी, थकीत घरफाळ्यात सूट देऊन घरफाळा वसूल करून महसूल वाढवावा, गटारीवरील असलेली अतिक्रमण बांधकामावर तातडीने कारवाई करावी, जनवारांच्या बाजार परिससरातील अतिक्रमणे हटवून तेथे पे अँड पार्क सुविधा सुरु करावी, आठवडा बाजार दिवशी वाडागल्ली मस्जिदसमोरील रिकाम्या जागेत चार चाकी ऐवजी दुचाकी पार्किंग व्यवस्था करावी आणि छ.शिवाजी नगर येथील सांडपाणी शुद्धीकरण(एस. टी. पी.) प्रकल्प अन्यत्र जागा संपादित करून हलवावा अशा सूचना मांडण्यात आल्या.
*दीडबाग कॉलनी येथे नवीन पाईप लाईन घालायच्या अगोदरच जुनी पाईप लाईन बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना मागील तीन चार दिवसापासून पाणी आले नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे कळताच तेथील वॉर्डाचे नगरसेवक असिफ सोनेखान यांनी तातडीने या भागात जाऊन पाहणी करून नवीन पाईप लाईनचा आराखडा संबंधिताना देऊन जुनी पाईप लाईन तातडीने दुरुस्त करण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. त्यांच्या या कार्यतत्परतेबद्दल तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी चर्चेमध्ये रहीमतबी खेडेकर, अनिकेत चराटी, आसावरी खेडेकर, पूनम लिचम, विक्रम पटेकर यांनी भाग घेतला आणि उपनगराध्यक्षा सौ. पूजा डोंगरे, सौ. अश्विनी चव्हाण, सौ. अन्वी खेडेकर,सौ. रेश्मा नौशाद बुड्डेखान, डॉ. इंद्रजित देसाई, श्रीमती कलावती खेडेकर, सौ. निशात चांद यांच्यासह मुख्याधिकारी सूरज सुर्वे, निहाल नाईकवाडी व इतर अधिकारी उपस्थित होते.
नगरपंचायतीच्या नियोजनशून्य करभारावर नूतन नगरसेवक आक्रमक
|