ताज्या बातम्या
आजऱ्यात नवीन पाईप योजनेला गळत्यांचे ग्रहण
By Administrator - 11/1/2026 8:28:24 PM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- मागील दोन ते तीन वर्षापासून अमृत जलयोजनेअंतर्गत आजरा शहरात व उपनगरात नवीन पाईपलाईन घालण्याचे काम सुरु आहे. परंतु ही नवीन पाईप लाईन वेळोवेळी फुटून गळत्यांचे प्रमाण वाढून नवीन योजनेला गळत्यांचे ग्रहण लागत असल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे. रस्त्यावरून हे पाणी वाहिल्यामुळे पदचाऱ्यांना आणि वाहतुकदारांना डोकेदुखी ठरत आहे.
27 कोटीची पाण्याची योजना आजऱ्यात आली खरी पण ही योजना मागील दोन वर्षापासून लोकांच्या सोयीची कमी पण डोकेदुखीच जास्त ठरत आहे. ठेकेदाराच्या विरोधात वेळोवेळी आंदोलने झाली, नगरपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर योजना पूर्ण करण्याची आंदोलकांना हमी दिली. वापरलेल्या साहित्याबाबत माहिती मागवण्यात आली परंतु पुढे काय झाले हे अजून कळायला मार्ग नाही. बाजारपेठ, आजरा पेट्रोलपंपाच्या पोळगाव रोडवर, सिद्धार्थ नगरच्या कोपऱ्यावर, वाडा गल्लीजवळ तसेच इतर अनेक ठिकाणी गळतीचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्याला आणि गटारीला जात आहे. प्रत्येकवेळेला रस्ता खुदाई होत असल्यामुळे चिखल आणि धुळीचे वाढलेले साम्राज्य यामुळे जनता पुरतीच हैराण झाली आहे.
पोळगाव रोडवर आजरा पेट्रोल पंपाजवळ पाईप घातल्यापासून चार ते पाचवेळा गळती लागल्यामुळे वेळोवेळी दुरुस्ती करायची नामुष्की आली आहे आणि ही पाईप एकाच ठिकाणी वारंवार का लिकेज होत आहे हे ही एक गूढ बनले आहे.पाण्याच्या टाकीजवळील राईसमिलच्या खालच्या बाजूस असलेल्या सईद स्प्रेपेंटर गॅरेज समोर मागील पाच ते सहा दिवसापासून गळती सुरु आहे. या गळतीचे पाणी त्यांच्या गॅरेजमध्ये शिरत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रार करुनसुद्धा नगरपंचायत ऐकायला तयार नाही अशी व्यथा त्यांनी आमच्या प्रतिनिधी समोर मांडली. या गळत्यांच्यावर लवकरात लवकर उपाय शोधून रस्ते करावेत तसेच ज्या ठिकाणी अजून पाईप लाईन घातलेली नाही ती पूर्ण करावी अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे.
आजऱ्यात नवीन पाईप योजनेला गळत्यांचे ग्रहण
|