बातम्या
नवीन रस्ते; मात्र सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर
By Administrator - 8/6/2026 9:57:31 PM
Share This News:
*नवीन रस्ते; मात्र सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर*
गटारी तातडीने साफ करण्याची मागणी*
**आजरा( हसन तकीलदार) आजरा शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले असून काही ठिकाणी कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, ही कामे सुरू असताना ठेकेदाराकडून खुदाई व साहित्य टाकण्याच्या प्रक्रियेदरम्यान गटारींमध्ये माती, दगड व इतर साहित्य पडल्याने अनेक गटारी तुंबल्या आहेत.
दि. ६ जून २०२६ पासून शहरात सुरू झालेल्या पावसामुळे तुंबलेल्या गटारींचे पाणी तसेच सांडपाणी थेट रस्त्यांवरून वाहू लागले आहे. यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत असून ही परिस्थिती आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक व धोकादायक ठरत आहे.
यापूर्वी अन्याय निवारण समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग, आजरा येथील उपअभियंता तसेच आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून गटारी तातडीने साफ करून घेण्याची मागणी करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर आज दि. ८ जून २०२६ रोजी आजरा नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, आजरा येथील उपअभियंता कार्यालयात भेट देऊन याबाबत जाब विचारला. तसेच संबंधित ठेकेदाराकडून तात्काळ गटारींची साफसफाई करून घेणे, रस्त्यांवर शिल्लक राहिलेली खडी व इतर साहित्य हटविणे आणि रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित व सुलभ करणे याबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी), नगरसेवक अभिषेक शिंपी, नगरसेवक शपरेश पोतदार, नगरसेवक असिफ पटेल,नगरसेवक निसार लाडजी, नगरसेवक आसिफ सोनेखान,नगरसेवक विक्रम पटेकर,माजी नगरसेवक किरण कांबळे , सामाजिक कार्यकर्ते आरिफ खेडेकर, गौरव देशपांडे आदिजण उपस्थित होते.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारास आवश्यक त्या सूचना देऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून गटारींची साफसफाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
नवीन रस्ते; मात्र सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर
|