बातम्या

‘निक्षय गीत मैफिल’ : संगीतातून क्षयरुग्णांना पोषण, कोल्हापुरात अनोखा उपक्रम!

Nikshay Geet Concert


By nisha patil - 9/23/2025 3:48:08 PM
Share This News:



‘निक्षय गीत मैफिल’ : संगीतातून क्षयरुग्णांना पोषण, कोल्हापुरात अनोखा उपक्रम!

कोल्हापूर, दि. २३ : संगीताच्या माध्यमातून सामाजिक कार्याची अनोखी सांगड घालणारा ‘निक्षय गीत मैफिल’ हा उपक्रम कोल्हापुरात राबवला जात असून, तो क्षयरुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. आतापर्यंत या उपक्रमातून ४७ क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले आहे.

हा उपक्रम जाणीव फाउंडेशन, यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्टप्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच जिल्हा क्षयरोग केंद्र, कोल्हापूर यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपक्रम गतिमान झाला आहे.

दररोज सायंकाळी साने गुरुजी परिसरातील विकास प्रतिज्ञा स्टुडिओ येथून फेसबुक लाइव्हवर ‘निक्षय गीत मैफिल’चे आयोजन केले जाते. सुप्रसिद्ध कलाकार प्रशांत जोशी आणि त्यांचे सहकारी संगीताच्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करतानाच क्षयरोगाबाबत जनजागृती करतात. या माध्यमातून क्षयरुग्णांसाठी पोषण किट देण्यासाठी आर्थिक मदत संकलित केली जाते.

ऑगस्ट २०२५ अखेर ३२,९०० रुपये जमा झाले असून, त्यातून ४७ पोषण किटचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

‘निक्षय गीत मैफिल’ला अधिक लोकाभिमुख करण्यासाठी २४ ऑक्टोबर २०२५ रोजी राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे भव्य मैफिल आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, प्रवेशासाठी देणगी रक्कम ऐच्छिक ठेवण्यात आली आहे.

रसिकांना प्रशांत जोशी यांच्या फेसबुक पेजवरून दररोज या मैफिलीचा आनंद घेता येतो. देणगीसाठी जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे शाखा-शाहूपुरी (IFSC Code: JSBP0000029, खाते क्रमांक: 029230100006553) येथे ऑनलाइन पद्धतीने निधी जमा करता येणार आहे. जमा झालेल्या निधीचा अहवाल पारदर्शकपणे जाणीव फाउंडेशनमार्फत ठेवला जात आहे.

‘निक्षय गीत मैफिल’ हा उपक्रम संगीत व समाजकार्याचा संगम ठरला असून, यामुळे क्षयरुग्णांना पोषण तर मिळतेच, शिवाय समाजात या आजाराविषयी जागरूकता आणि सहानुभूती निर्माण होत आहे.


‘निक्षय गीत मैफिल’ : संगीतातून क्षयरुग्णांना पोषण, कोल्हापुरात अनोखा उपक्रम!
Total Views: 68