बातम्या
नऊ महिन्यांची गर्भवती आणि पोटातील बाळाचा मृत्यू; उपचार न मिळाल्याने करुण अंत
By nisha patil - 2/10/2026 3:57:19 PM
Share This News:
नऊ महिन्यांची गर्भवती आणि पोटातील बाळाचा मृत्यू; उपचार न मिळाल्याने करुण अंत
पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर असे मृत महिलेचे नाव आहे. ६ सप्टेंबर रोजी प्रकृती खालावल्याने स्वाती यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीत गर्भातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे तसेच बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळल्याचे आढळले. डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, उपचाराच्या खर्चावरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. माहेरच्यांनी खर्च करण्याची तयारी दर्शवूनही उपचार झाले नसल्याचा आरोप आहे.
दरम्यान, प्रकृती गंभीर झाल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी स्वाती यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पोटातील नऊ महिन्यांचे बाळही दगावले. या प्रकरणी पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल निंबाळकर, सासू शारदा निंबाळकर आणि नणंद ऐश्वर्या यांच्याविरोधात पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती यांचा मानसिक किंवा शारीरिक छळ झाला होता का, यासह संपूर्ण प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे.
नऊ महिन्यांची गर्भवती आणि पोटातील बाळाचा मृत्यू; उपचार न मिळाल्याने करुण अंत
|