बातम्या

गांधीनगर प्रश्नात पाडापाडी नको; बांधकामे नियमित करा – विजयेंद्र माने

No demolition in the Gandhinagar issue regularize the constructions


By nisha patil - 9/16/2026 11:25:37 PM
Share This News:



गांधीनगर प्रश्नात पाडापाडी नको; बांधकामे नियमित करा – विजयेंद्र माने
 

गांधीनगरच्या बांधकामांवर कारवाई झाल्यास प्रभाग ३ मधील सर्व नगरसेवकांचा १०० टक्के विरोध राहील, अशी भूमिका कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक विजयेंद्र माने यांनी स्पष्ट केली. गांधीनगरचा प्रश्न हा आमच्या मतदारसंघाशी संबंधित असून, या विषयात इतरांनी हस्तक्षेप न करता प्रशासन आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी, असेही त्यांनी सांगितले.
 

गांधीनगरमधील बांधकामे नियमित करून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याची गरज आहे. हद्दवाढीमध्ये ४३ गावांचा समावेश करण्याची चर्चा असताना सध्या केवळ नऊ गावांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत गांधीनगरमधील बांधकामे व अतिक्रमणांवर थेट पाडापाडीची भूमिका घेतल्यास भविष्यात अन्य गावे कोल्हापूर शहरात समाविष्ट होण्यास विरोध करतील, असा इशाराही माने यांनी दिला.
 

‘गांधीनगरमधील नागरिकांची चूक नाही’
गांधीनगरमधील नागरिकांनी त्या-त्या काळात प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनांनुसार परवानग्या घेऊन बांधकामे केली आहेत. त्यामुळे केवळ नागरिकांना दोषी ठरवून त्यांच्या घरांवर किंवा बांधकामांवर कारवाई करणे योग्य नाही, असे माने यांनी स्पष्ट केले.

 

“या नागरिकांनी आम्हाला मतदान केले आहे. त्यांच्या घरांवर किंवा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कोणी येत असेल, तर प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व नगरसेवक त्याचा १०० टक्के विरोध करतील,” असा स्पष्ट इशारा विजयेंद्र माने यांनी दिला.
 

गांधीनगरमधील बांधकामांचा प्रश्न कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर सोडविण्याबरोबरच बांधकामे नियमित करून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा मार्गही विचारात घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.


गांधीनगर प्रश्नात पाडापाडी नको; बांधकामे नियमित करा – विजयेंद्र माने
Total Views: 17