ताज्या बातम्या
कोणत्याही संस्थेची 40% कपात केलेली नाही : योगेश गोडबोले
By nisha patil - 7/10/2025 11:24:41 AM
Share This News:
गोकुळ दूध संघाने देशात उच्चांकी १३६ कोटी रुपयांचा अंतिम दूध दरफरक वितरित केल्याची घोषणा केल्यानंतर आता या घोषणेबरोबरच ४० टक्के डिबेंचर कपातीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
या संदर्भात शोमीका महाडिक यांनी तीव्र सवाल उपस्थित केला आहे. “जर गोकुळ संघाने शेतकऱ्यांच्या सहकार्याने एवढा मोठा नफा कमावला असेल, तर शेतकऱ्यांच्या हक्काची ४० टक्के रक्कम ‘डिबेंचर’च्या नावाखाली घेण्याची गरज काय होती, याचे स्पष्ट स्पष्टीकरण गोकुळने द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, काही शेतकऱ्यांनीही गोकुळकडून ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत रक्कम कपात केल्याचे आरोप केले होते. या आरोपांवर गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, “गोकुळने आजवर कोणत्याही दूध संस्थेची ४० टक्के कपात केलेली नाही. उलट, शेतकऱ्यांमुळेच संघाला १३६ कोटींचा नफा मिळवून देशातील अव्वल संघ म्हणून स्थान मिळाले आहे.”
डॉ. गोडबोले यांनी स्पष्ट केले की, डिबेंचर योजना ही नवीन नाही, ती १९९३ पासून सुरू असून, या माध्यमातून संघाला चालू भांडवल उपलब्ध करून देता येते आणि यामुळे शेतकऱ्यांनाच अप्रत्यक्षपणे आर्थिक फायदा मिळतो. असे स्पष्टीकरण योगेश गोडबोले यांनी दिला.
कोणत्याही संस्थेची 40% कपात केलेली नाही : योगेश गोडबोले
|