कृषी

ऊसदरावर तोडगा निघाला नाही; राजू शेट्टींची कारखाने बंद ठेवण्याची चेतावणी

No solution found on sugarcane price


By nisha patil - 4/11/2025 11:47:21 AM
Share This News:



कोल्हापूर:- कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दर निश्चिती संदर्भात बोलावण्यात आलेली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे. शेतकरी संघटनांनी सरकार आणि साखर कारखानदारांकडून ठोस निर्णय न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे की, जोपर्यंत ऊसाचा दर ३६०० ते ३७०० रुपये प्रती टन लागू केला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही साखर कारखान्याला सुरु होऊ देणार नाही. दर निश्चितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली होती. मात्र, शेतकरी संघटना, साखर कारखानदार आणि प्रशासन यांच्यात कोणतीही एकमताची भूमिका न ठरल्याने बैठक निष्फळ ठरली.

राजू शेट्टी यांनी स्पष्ट सांगितले की ऊस उत्पादकांना न्याय्य दर न मिळाल्यास संघटना आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल. त्यांनी सरकारवर आणि कारखानदारांवर अन्यायकारक वागणुकीचा आरोप करत म्हटले की, एफआरपी (Fair and Remunerative Price) पेक्षा कमी दर देणे हा शेतकऱ्यांच्या हितावर आघात आहे. “सरकार आणि कारखानदारांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना तोडगा देणे गरजेचे आहे. दर ३६०० ते ३७०० रुपये प्रती टन लागू केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा ठाम इशारा शेट्टी यांनी दिला.

साखर हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर दर निश्चितीचा मुद्दा तापलेला आहे. केंद्र सरकारने एफआरपी दर जाहीर केला असला तरी कारखाने बाजारातील परिस्थितीचा दाखला देत कमी दर देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. राजू शेट्टी यांनी पुढील काही दिवसांत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आंदोलनाची रणनीती ठरवण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी दुसऱ्या बैठकीचे आयोजन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

या घडामोडींमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य तो निर्णय सरकार आणि कारखानदारांनी घेतला नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर हंगामावर संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


ऊसदरावर तोडगा निघाला नाही; राजू शेट्टींची कारखाने बंद ठेवण्याची चेतावणी
Total Views: 41