बातम्या

Om accidental death....स्वप्नांच्या जिन्यावरून घसरला पाय... आणि थांबली एक जीवघेणी वाटचाल

Om s accidental death


By nisha patil - 10/7/2025 10:48:31 PM
Share This News:



ओमच्या अपघाती मृत्यूने उघडं झालय मेकॅनिकचं अपूर्ण स्वप्न – कष्टकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दिंडनेर्ली (ता. करवीर) | तारा न्यूज प्रतिनिधी “दहावी नंतर डिझेल मेकॅनिक होणार आणि बाबांच्या गॅरेजला मदत करणार...” असं स्वप्न पाहणाऱ्या ओम पाटीलच्या आयुष्याला घरच्या जिन्यावरून पाय घसरून लागलेला झटका अखेरचा ठरला. बुधवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास ओमचा मृत्यू झाला आणि कष्टाने उभ्या राहिलेल्या कुटुंबाच्या आयुष्यावर काळाच्या सावल्या पडल्या.

१७ वर्षाचा आदित्य ऊर्फ ओम अमृत पाटील याने जैताळ आयटीआयमध्ये डिझेल मेकॅनिकचा कोर्स सुरू केला होता. वडिलांच्या गॅरेजमध्ये रोलर वर्कशॉपमध्ये हातभार लावत तो आपला अभ्यास करत होता. मात्र, बुधवारी पहाटे झोपेतून उठून बाथरूमहून वर जात असताना जिन्याच्या पायरीवरून पाय घसरून तो खाली पडला. आवाज ऐकून त्याची आई धावत आली, वडीलही धावले. स्वतःच्या वाहनातून त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तो आधीच मृत झाल्याचे घोषित केले.

आई-वडिलांच्या हंबरड्याने गावात शोककळा
शवविच्छेदनानंतर ओमचा मृतदेह घरी आणण्यात आला. वडील अमृत पाटील, आई आणि बहिणीचा हंबरडा उपस्थितांचे काळीज हेलावून गेला. एकुलता मुलगा गमावल्याने पाटील कुटुंब उघडं पडलं आहे. अमृत पाटील यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हेल्पर म्हणून सुरुवात करून स्वतःचे गॅरेज आणि रोलर उभे केले. त्या कष्टकऱ्याच्या स्वप्नांना आता काळाने विराम दिला आहे.

दुर्दैवी योगायोग : शेजारील दोघे मित्रही काळाच्या पोटी
अजून एक दुर्दैवी गोष्ट म्हणजे, ओमचा शेजारील मित्र आयुष शेटे याचा केवळ तीन महिन्यांपूर्वी १० एप्रिल रोजी पोहताना बुडून मृत्यू झाला होता. तोही एकुलता होता. ओम आणि आयुष नेहमी एकत्र असायचे. आता दोघेही काळाच्या अधीन झाले असून, दोघांच्याही घरांत दुःख अनावर झालं आहे.

तारा न्यूज विशेष टिपण
 

ओम पाटीलसारखे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात शिक्षणासोबत कुटुंबाला आधार देत असतात. त्यांची स्वप्नं, कष्ट आणि जीवनाच्या वाटा अचानक संपतात तेव्हा केवळ एक अपघात न राहता तो समाजातील एक शोकांतिकेचा प्रसंग बनतो. प्रशासनाने अशा अपघातांबाबत जनजागृती, सुरक्षित घररचना आणि आपत्कालीन मदतीच्या दृष्टिकोनातून पावले उचलण्याची गरज आहे.


Om accidental death....स्वप्नांच्या जिन्यावरून घसरला पाय... आणि थांबली एक जीवघेणी वाटचाल
Total Views: 170