बातम्या
विजेचा प्रवाह दिलेल्या कुंपणाला स्पर्शाने एकाचा मृत्यू
By nisha patil - 11/21/2026 1:02:58 PM
Share This News:
विजेचा प्रवाह दिलेल्या कुंपणाला स्पर्शाने एकाचा मृत्यू
*आजरा(हसन तकीलदार)- खानापूर ता. आजरा येथील शेताभोवती लावलेल्या तारेच्या कुंपणाला विजेचा प्रवाह दिल्याने त्याचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आजरा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत आजरा पोलिस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,
भागोजी सदु जाधव (वय ६४ रा. खानापूर ता. आजरा) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा दिगंबर भागोजी जाधव रा. खानापूर यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६.४५ वाजता आंबेशेत नावाच्या शेतात ही घटना घडली. फिर्यादी व त्यांचे वडील तसेच इतर लोक असे पळून गेलेल्या बैलाचा शोध घेत असताना ही घटना घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांच्या शेताभोवती तारेचे कुंपण करून त्याला आपल्या शेताच्या घरातील विजेचा पुरवठा दिला होता. त्या कुंपणाला स्पर्श झाल्यास कोणाचाही मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही बेजबाबदारपणे विजेचा पुरवठा दिल्याने त्या तारेच्या कुंपणास फिर्यादी यांच्या वडिलांचा स्पर्श होऊन त्यांना विजेचा धक्का बसून ते मयत झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी सुषमा सुभाष राणे आणि जितेंद्र सुभाष राणे दोघे रा. खानापूर ता. आजरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे हे करीत आहेत.
विजेचा प्रवाह दिलेल्या कुंपणाला स्पर्शाने एकाचा मृत्यू
|