बातम्या
कोकण-कोल्हापूर मंडळाची ऑनलाईन कार्यशाळा
By nisha patil - 10/17/2026 4:18:51 PM
Share This News:
कोकण-कोल्हापूर मंडळाची ऑनलाईन कार्यशाळा
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाची चाचणी नसून ती त्यांच्या भावनिक स्थैर्याची आणि मानसिक क्षमतेचीही कसोटी मानली जाते. परीक्षा जसजशी समीप येते, तसतशी विद्यार्थ्यांच्या मनातील घालमेल तीव्र होत जाते. घरात निर्माण होणारे अतिदडपणाचे वातावरण, निकालाच्या टक्केवारीवरून नातेवाईक व समाजाकडून केली जाणारी तुलना आणि भविष्यकाळाची अनामिक भीती यामुळे अनेक हुशार विद्यार्थीही गोंधळून जातात. अनेकदा अवाजवी जागरण, सतत पुस्तकात मान घालून बसणे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ऐन परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक थकवा जाणवतो.
ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाने पारंपरिक उपदेशांच्या पलीकडे जाऊन एका अभिनव उपक्रमाचे आयोजन केले. ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ या उपक्रमांतर्गत सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी थेट ऑनलाईन विशेष कार्यशाळा पार पडली. पाचही जिल्ह्यांतील शाळांमध्ये मोठ्या पडद्यावर युट्युब लाईव्ह हे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले, ज्यामध्ये हजारो विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी झाले होते.
सत्राचे प्रास्ताविक करताना कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अभ्यास, शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्थैर्य यांचा ताळमेळ घालण्याचे महत्त्व स्पष्ट केले. यश हे निव्वळ तासनतास अभ्यास करण्यात नसते, तर ते सूत्रबद्ध नियोजनात दडलेले असते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या ऑनलाईन व्यासपीठावर कोल्हापूर मंडळाचे सचिव गजानन उकिरडे, कोकण विभागीय मंडळाच्या सचिव पुनीता गुरव, क्षेत्रीय अधिकारी आणि पाचही जिल्ह्यांचे मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अभ्यासाचे व्यवस्थापन: दिशा, शिस्त आणि मोजमाप
अनुभवी शिक्षक श्रीराम टेके यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा मार्गदर्शक आराखडा उलगडून दाखवला. परीक्षेच्या तयारीमध्ये दिशाहीन वाचन टाळून 'दिशा, शिस्त आणि मोजमाप' या त्रिसूत्रीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
* *विषयांचे विभाजन व लहान नोंदवही:* विद्यार्थ्यांनी सुरुवातीलाच स्वतःचे पक्के, मध्यम आणि कच्चे विषय ओळखावेत. ज्या विषयांत गुण कमी पडतात, त्यांना दैनंदिन अभ्यासात प्राधान्याने वेळ द्यावा. वाचताना निव्वळ पाने चाळण्यापेक्षा प्रत्येक विषयाची एक स्वतंत्र लहान नोंदवही ठेवावी. यामध्ये महत्त्वाची सूत्रे, व्याख्या, आकृत्या आणि महत्त्वाचे मुद्दे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवावेत. परीक्षेच्या आदल्या रात्री अवाढव्य पुस्तके चाळण्याऐवजी ही छोटी वही वाचल्यास अवघ्या काही तासांत सर्व उजळणी पूर्ण होते.
* *विश्रांतीची जोड आणि प्रश्नपत्रिका सराव:* मेंदूची ग्रहणक्षमता मर्यादित असल्याने पंचेचाळीस मिनिटांच्या अभ्यासानंतर पंधरा मिनिटांची विश्रांती घ्यावी. नोव्हेंबर अखेरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करून डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांत प्रत्यक्ष घड्याळाच्या वेळेनुसार किमान पाच ते सात जुन्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. उत्तरपत्रिकेतील अक्षरांचा नीटनेटकेपणा आणि वेळेची मर्यादा सांभाळण्याची कला केवळ सातत्यपूर्ण सरावातूनच जमू शकते.
* *पालक आणि विद्यार्थ्यांचा सुसंवाद:* घरामध्ये अभ्यासासाठी केवळ शांतताच निर्माण न करता प्रेमळ व आश्वासक वातावरण ठेवावे. पालकांनी दर रविवारी मुलांसोबत वीस मिनिटांचा मोकळा संवाद साधावा. आपल्या पाल्याची तुलना कधीही दुसऱ्या मुलाशी करू नये; कारण प्रत्येक मुलाची जडणघडण आणि क्षमता वेगळी असते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हा सुवर्ण त्रिकोण घट्ट राहिला तर मुलांचे मानसिक खच्चीकरण सहज टाळता येते.
आहार आणि दिनचर्या: निरोगी शरीराविना मेंदू निष्प्रभ
प्रख्यात नेत्रतज्ज्ञ आणि मॅराथॉन धावपटू डॉक्टर राहुल फासे यांनी आहाराचा आणि दिनचर्येचा अभ्यासावर कसा थेट परिणाम होतो, याचे शास्त्रीय विश्लेषण केले. शरीर हे यंत्रासारखे असून त्याला उत्तम इंधनाची गरज असते, असे त्यांनी नमूद केले.
* *मेंदूसाठी पोषक आहार:* स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी दररोज चार ते पाच भिजवलेले बदाम, अक्रोड आणि झटपट ताकद देणारी केळी नियमित खावीत. शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांसाठी आहारात दूध, दही, ताक, उकडलेले अंडे अथवा दर्जेदार पनीर असावे. हिरव्या पालेभाज्या, बीट आणि गाजर यांमुळे शरीरातील लोह आणि डोळ्यांसाठी उपयुक्त असणारे जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात मिळते, ज्यामुळे अभ्यास करताना डोकेदुखी किंवा थकवा येत नाही.
* *भ्रमणध्वनीचे संकट आणि डोळ्यांची काळजी:* अभ्यासाचे निमित्त करून तासनतास भ्रमणध्वनीच्या पडद्याकडे पाहत राहिल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर व मेंदूवर प्रचंड विपरीत परिणाम होत आहे. रात्री जेवताना आणि झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी भ्रमणध्वनी बाजूला ठेवणे बंधनकारक असावे. अभ्यास करताना दर वीस मिनिटांनी वीस सेकंदांसाठी किमान वीस फूट अंतरावरील निसर्गाकडे किंवा वस्तूकडे पाहावे, ज्यामुळे डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होतात.
* *शांत झोप आणि भरपूर पाणी:* झोप हे मेंदूची स्मृती साठवून ठेवणारे सर्वांत मोठे नैसर्गिक औषध आहे. रात्री अवाजवी जागरण करून अभ्यास करणे स्वतःची फसवणूक करण्यासारखे आहे. रात्री साडेदहा ते पहाटे साडेपाच ही झोपेची सर्वोत्तम वेळ आहे. दिवसभरात किमान तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यायल्यास शरीरातील आळस निघून जातो. परीक्षेच्या तोंडावर बाहेरचे तळलेले पदार्थ, रस्त्यावरील अस्वच्छ खाद्यपदार्थ आणि शीतपेये पूर्णपणे वर्ज्य करावीत, जेणेकरून पोटाचे विकार उद्भवणार नाहीत.
मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापन: नकारात्मकतेला हद्दपार करा
ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर कपिल लळीत यांनी विद्यार्थ्यांच्या भावनांची अचूक नस पकडली. त्यांनी विद्यार्थ्यांचे तीन स्वभाव विशद केले. सतत "माझे कसे होणार" म्हणून अतिताण घेणारा ‘मगू’ आणि "अजून खूप वेळ आहे, नंतर करू" असा गाफील राहणारा ‘निकू’ हे दोन्ही स्वभाव अपयशाला आमंत्रण देतात. याउलट दररोज नियमित थोडा थोडा अभ्यास करणारा आणि शिक्षकांची मदत घेणारा ‘अप्पू’ हाच खरा यशाचा मानकरी ठरतो.
* *सकारात्मक ताणाची आवश्यकता:* मनात कोणताच ताण नसेल तर कृती घडत नाही आणि प्रमाणाबाहेर ताण आला तर हात थरथरणे, पोटात गोळा येणे किंवा घशाला कोरड पडणे असे शारीरिक त्रास सुरू होतात. त्यामुळे अभ्यासाला योग्य दिशा देण्याइतपत थोडा सकारात्मक ताण असणे आवश्यक आहे.
* *नकारात्मक विचारांवर फुली:* जेव्हा जेव्हा मनात भीतीचे विचार येतील, तेव्हा स्वतःला त्वरित थांबण्याचा इशारा द्यावा. डोळे मिटून दीर्घ श्वास घ्यावा, मनातील अस्वस्थतेचे शांतपणे निरीक्षण करावे आणि पुन्हा नव्या उत्साहाने प्रत्यक्ष वाचनास लागावे. पंचवीस मिनिटे पूर्ण एकाग्रतेने एका घटकाचा अभ्यास आणि पाच मिनिटांची विश्रांती या साध्या तंत्राने मन कधीही भरकटत नाही.
* *उजळणी म्हणजे केवळ घोकंपट्टी नव्हे:* वाचलेला भाग बंद करून आठवून पाहणे म्हणजे खरी उजळणी. आपण वाचलेला एखादा नियम घरात आईला किंवा लहान भावाला सोप्या भाषेत समजावून सांगावा. इतरांना समजवता आले की आपला विषय पूर्ण पक्का झाला, हे समजून जावे. मुलांनी कोणाशीही स्पर्धा न करता स्वतःच्या कालच्या प्रगतीशी स्पर्धा करावी.
कार्यक्रमाचा समारोप करताना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सचिन नलावडे यांनी सर्व तज्ञांचे मनःपूर्वक आभार मानले. कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाने सुरू केलेला हा उपक्रम केवळ गुण मिळवण्यासाठी नसून मुलांचे मानसिक आरोग्य सांभाळणारा आणि त्यांना जीवनाच्या लढ्यासाठी सज्ज करणारा आधारवड ठरला आहे, असे त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
दोन तास चाललेल्या या अभ्यासपूर्ण आणि भावस्पर्शी संवादाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भीतीचे सावट पार पुसून टाकले.
कोकण-कोल्हापूर मंडळाची ऑनलाईन कार्यशाळा
|