विशेष बातम्या
शंभर कोटींच्या रस्त्यावर फक्त 'डिफेंडर'च चालते!
By nisha patil - 7/26/2025 2:42:03 PM
Share This News:
शंभर कोटींच्या रस्त्यावर फक्त 'डिफेंडर'च चालते!
आपचं डांबरी आंदोलन; निकृष्ट कामावर सवालांची सरबत्ती
नगररोत्थान योजनेतून सुरू असलेल्या १०० कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांवर आम आदमी पक्षाने शुक्रवारी शाहू मैदान परिसरात "फक्त डिफेंडर चालणाऱ्या रस्त्यां"चे लक्षवेधी आंदोलन करून जोरदार टीका केली. पहिल्याच पावसात पडलेले खड्डे आणि दर्जाहीन कामावर आप ने आलिशान गाडी 'डिफेंडर'ची प्रतिकृती उभारून निषेध नोंदवला.
‘शंभर कोटीच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकते’ – अशा मजकुराचा फलक हे आंदोलन ठळक बनवत होता. आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई म्हणाले, "शंभर कोटी रुपये मंजूर झाले म्हणजे विकास नाही, तर दर्जेदार काम होणं ही आमदार क्षीरसागर यांची जबाबदारी आहे." सामान्य नागरिक, दुचाकीस्वारांचे हाल सुरूच आहेत, पण आलिशान गाड्यांमुळे यांचे दुःख कळत नाही, अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, "निकृष्ट दर्ज्याचे काम करूनही ठेकेदाराला तब्बल २२ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. त्यामागे अधिकाऱ्यांचा साटेलोटा असून, महापालिका, अधिकारी, सल्लागार, सब-ठेकेदार व लोकप्रतिनिधी मिळूनच हे रस्ते खालावत आहेत."
रस्त्याचे डिझाईन, मापे, दर्जा चाचणी, साईटवरील अधिकारी गैरहजर, गटर कामाआधी डांबरीकरण यामुळेच रस्त्यांचे हे हाल झाले आहेत. ठेकेदार मे. एवरेस्ट कन्स्ट्रक्शन, सल्लागार संदीप गुरव अँड असोसिएट्स यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
या वेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजीत कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतिफ, दुष्यंत माने, उषा वडर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शंभर कोटींच्या रस्त्यावर फक्त 'डिफेंडर'च चालते!
|