बातम्या

ऊसदराचे परिपत्रक काढण्याचे कारखानदारांना आदेश द्या!..

Order the manufacturers to issue a circular on sugarcane prices


By nisha patil - 11/16/2026 7:49:38 PM
Share This News:



ऊसदराचे परिपत्रक काढण्याचे कारखानदारांना आदेश द्या!..
 

धनाजी चुडमुंगे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; ऊसदराच्या तोडग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम... 
 

कोल्हापूर, दि. १६ (प्रतिनिधी : आचिन हेरवाडे)..... यंदाच्या ऊसदराच्या आंदोलनातून झालेला तोडगा अद्यापही शेतकऱ्यांसाठी संभ्रमाचा विषय ठरत असून, कारखानदारांनी प्रत्यक्षात किती दर देणार, याबाबत स्पष्टता येण्यासाठी सर्व साखर कारखानदारांना अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 

यंदाचा ऊसदराचा तोडगा साखर कारखानदारांच्या फायद्याचा ठरल्याचे चित्र असून, सर्वच शेतकरी संघटनांना हा तोडगा मान्य नसल्याचे चुडमुंगे यांनी स्पष्ट केले. दुष्काळजन्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन आंदोलन अधिक ताणणे योग्य वाटले नाही. मात्र, ऊसदरासाठीचा संघर्ष यापुढेही सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
 

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील यंदाचे ऊसदर आंदोलन ३९०० रुपये पहिली उचल या तोडग्यावर संपले. त्यानंतर हंगाम संपल्यावर १०० रुपये आणि साखरेचा दर वर्षभर ४५ रुपयांपर्यंत राहिल्यास आणखी २०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, या तोडग्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र, आंदोलनकर्त्यांनी जाहीर केलेली भूमिका आणि कारखानदारांकडून प्रसिद्ध करण्यात येणारे दर यामध्ये तफावत दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
 

नवीन हंगामातील साखर बाजारात येत असतानाही साखरेचे दर वाढत असल्याचे चित्र आहे. भविष्यात साखरेचे दर किलोला ६० रुपयांच्या पुढे राहण्याचा अंदाज व्यक्त होत असताना या वाढीव दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी तोडग्यानुसार देण्यात येणाऱ्या संपूर्ण दराचा तपशील अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आणि कारखानदारांच्या घोषणेत तफावत
किणी टोलनाक्यावरील आंदोलन मागे घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दिलेल्या पत्रात ३९०० रुपये पहिली उचल, हंगाम संपल्यानंतर १०० रुपये, तसेच साखरेचा दर वर्षभर ४५ रुपये राहिल्यास २०० रुपये अतिरिक्त देण्याचा उल्लेख आहे. मात्र, साखरेचा दर ४५ रुपयांपेक्षा अधिक राहिल्यास पुढील निर्णय बसून घेण्याचे नमूद करण्यात आले आहे. पत्रातील या अटींमुळे अंतिम ऊसदर नेमका किती मिळणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे.

 

अथणी शुगर आणि वारणा कारखान्यांची स्वतंत्र घोषणा
 

शाहूवाडी येथील उदयसिंह गायकवाड कारखाना भाडेतत्त्वावर चालविणाऱ्या अथणी शुगरने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात ३९०० रुपये पहिली उचल आणि हंगाम संपल्यानंतर १०० रुपये देण्याचा उल्लेख आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील २०० रुपयांसाठी साखरेचा दर ४५ रुपयांच्या पुढे राहण्याची अट नमूद करण्यात आली आहे. वारणा कारखान्यानेही साखरेचा दर ४५ रुपयांच्या पुढे राहिल्यास दिवाळीला अंतिम दर म्हणून २०० रुपये देण्याची घोषणा माध्यमांद्वारे केली आहे. त्यामुळे आंदोलनादरम्यान जाहीर झालेला तोडगा आणि कारखान्यांच्या प्रत्यक्ष घोषणांमध्ये नेमके काय अंतर आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
 

आंदोलनातील घोषणा आणि प्रत्यक्ष दरात फरक?
 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ६१ तास महामार्ग रोखून आंदोलन केले होते. आंदोलनानंतर ३९०० रुपये पहिली उचल, हंगाम संपल्यावर १०० रुपये, साखरेचा दर वर्षभर ४५ रुपये राहिल्यास २०० रुपये आणि त्यापुढे साखरेचा दर गेल्यास वाढीव रकमेतील ७० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना देण्याची भूमिका जाहीर करण्यात आली होती. मात्र, काही कारखान्यांनी प्रसिद्ध केलेल्या घोषणांमध्ये या अटींचा स्पष्ट उल्लेख नसल्याने तोडग्याच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
 

२०२३ च्या तोडग्याची पुनरावृत्ती होण्याची भीती
 

२०२३ च्या गळीत हंगामात शिरोली फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महामार्ग रोखून आंदोलन केले होते. त्यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या मध्यस्थीने दुसऱ्या हप्त्याबाबत तोडगा काढण्यात आला होता. तीन हजार रुपयांच्या आत दर दिलेल्या कारखान्यांनी १०० रुपये, तर तीन हजार रुपयांपेक्षा अधिक दर दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये अतिरिक्त देण्याचे ठरले होते. मात्र, जिल्ह्यातील केवळ पाच कारखान्यांनी या तोडग्याची अंमलबजावणी केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. उर्वरित कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम मिळाली नसल्याने यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
 

यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, आंदोलनातून ठरलेल्या दराची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडेल. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व साखर कारखानदारांना तातडीने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश द्यावेत आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अंतिम ऊसदराचा स्पष्ट तपशील जाहीर करण्यास भाग पाडावे, अशी मागणी आंदोलन अंकुशच्या वतीने करण्यात आली आहे.


ऊसदराचे परिपत्रक काढण्याचे कारखानदारांना आदेश द्या!..
Total Views: 104