बातम्या
गोकुळ बचावसाठी एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथे महायुती सरकारच्या अध्यादेशाची होळी
By nisha patil - 7/11/2026 10:53:48 PM
Share This News:
गोकुळ बचावसाठी एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथे महायुती सरकारच्या अध्यादेशाची होळी
कोल्हापूर प्रतिनिधी : अजित बोडके गोकुळ शिरगाव (कोल्हापूर) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या महायुती सरकारच्या अध्यादेशाचा जाहीर निषेध करत आज एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकरी, दूध उत्पादक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारच्या अध्यादेशाची प्रत जाळून होळी केली.
"गोकुळ बचाव, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या महायुती सरकारचा जाहीर निषेध!" असा आशय असलेला भव्य बॅनर हातात घेऊन आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी बोलताना आंदोलकांनी सांगितले की, "आपल्या भागामध्ये गोकुळ आहे, आपण एक लक्षात ठेवायचं, त्या चौघांना इकडे तिकडे येऊ द्यायचं नाही. गोकुळ हे शेतकऱ्यांचे आहे, ते कोणाच्या खाजगी मालकीचे होऊ देणार नाही."
गोकुळच्या संचालक मंडळाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने काढलेला अध्यादेश हा लोकशाही विरोधी असून, यामुळे हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, दूध उत्पादक, तसेच सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. अध्यादेश मागे घेऊन गोकुळची निवडणूक नियमानुसार आणि लोकशाही पद्धतीने घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
गोकुळ बचावसाठी एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथे महायुती सरकारच्या अध्यादेशाची होळी
|