बातम्या
सामान्य घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By nisha patil - 12/15/2025 6:10:11 PM
Share This News:
सामान्य घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेतला असला तरी सामान्य घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर लावले जाणार नाहीत, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.
प्रश्नोत्तराच्या तासात भास्कर जाधव व रईस शेख यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सुरुवातीला सर्व ग्राहकांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटरचा प्रस्ताव होता. मात्र नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर आक्षेप आल्याने राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीचा निर्णय घेतला.
पहिल्या टप्प्यात फिडर व डिस्ट्रीब्युशन मीटर बसवण्यात आले असून, सध्या शासकीय कार्यालये व आस्थापनांमध्येच प्रीपेड स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. सामान्य ग्राहकांसाठी पोस्टपेड स्मार्ट मीटरच लावले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, स्मार्ट मीटर स्वीकारणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात १० टक्के सवलत देण्यात येत असून, मोबाईल ॲपद्वारे तासागणिक वीज वापराची माहिती मिळत असल्याने वापरावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे. तसेच २४ तास तक्रार निवारण व्यवस्था उपलब्ध असून, आतापर्यंत बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमध्ये त्रुटींचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी आहे.
पुढील पाच वर्षे स्मार्ट मीटर पोस्टपेड स्वरूपातच राहणार असून, प्रीपेड मीटर सक्तीचा कोणताही निर्णय नाही, असे स्पष्ट करत विधानसभेतील सदस्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सामान्य घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
|