बातम्या
अन्यथा महानगरपालिकेवर फौजदारी : कोल्हापूर नेक्स्ट चा इशारा
By nisha patil - 9/10/2025 5:52:35 PM
Share This News:
अन्यथा महानगरपालिकेवर फौजदारी : कोल्हापूर नेक्स्ट चा इशारा
दि.०९ : वारंवार घडणाऱ्या बेकायदेशीर वृक्षतोडीचा घटनांबाबत जबाबदार कर्मचाऱ्यांवर एक आठवड्याच्या आत कारवाई करा अन्यथा महानगरपालिके विरोधात फौजदारी दाखल करू असा इशारा कोल्हापूर नेक्स्ट च्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना दिला.
काल उभा मारुती चौकाजवळील ब्रम्हेश्वर बाग परिसरामध्ये महानगरपालिका कर्मच्यार्यांनी तीन झाडांची कत्तल केली. या संदर्भात उद्यान विभागाच्या कर्मचारी / अधिका ऱ्यांना विचारणा करण्याकरता संपर्क साधला असता, कोणीही उत्तर दिले नाही. सदर विषय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उद्यान अधीक्षकांनी तेथील दोन झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी परवानगी दिल्याचे पत्र सामाजिक माध्यमांमध्ये अग्रेषित केले.दोन झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्या छाटणीची परवानगी असताना तीन झाडे केवळ बुंधा ठेवून सरसकट कापली गेली. त्या ठिकाणी उद्यान अधीक्षकांनी येणे अपेक्षित असताना ते आले नाहीत. यावरून शिष्टमंडळाने उद्यान अधीक्षकांना धारेवर धरले. त्याचबरोबर सदर घटनेचा आणि जागेचा पंचनामा न केल्यामुळे कार्यकर्ते संपर्क झाले.
अशा प्रकारचे, झाडे जगणार नाहीत या पद्धतीने तोडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तसेच वृक्षतोडीचा कंत्राटदार आणि एक मुकादम लोकांकडून पैसे घेऊन झाडे तोडतात असा आरोप शिष्टमंडळाने केला. यावर अंकुश घालणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे काल झालेल्या प्रकारामध्ये संबंधित मुकादमास निलंबित करून त्याची सखोल चौकशी करावी. तसेच, गेली अनेक वर्षे एकच ठेकेदार असल्याने योग्य ती प्रक्रिया करून त्याला हटवून अन्य एकापेक्षा अधिक ठेकेदारांची नियुक्ती करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली. एक आठवड्यात कारवाई न झाल्यास महानगरपालिकेवर फौजदारी करू असाही इशारा शिष्टमंडळाने दिला. यावर उत्तर देताना अतिरिक्त आयुक्तांनी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश उद्यान अधीक्षकांना दिले तसेच याबाबत कार्यवाही करण्यासाठी अहवाल देण्याचे आदेश दिले. यावेळी संघटनेचे सर्वश्री चंद्रकांत चव्हाण, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाडगे, प्रदीप उलपे, विजयसिंह खाडे पाटील, स्वाती कदम, ओंकार गोसावी, तसेच शहर अभियंता रमेश मस्कर उपस्थित होते.
अन्यथा महानगरपालिकेवर फौजदारी : कोल्हापूर नेक्स्ट चा इशारा
|