बातम्या

‘परिवर्तन’च्या निरपेक्ष कार्याने भारावलो – मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार

Overwhelmed by the absolute work of Parivartan


By nisha patil - 10/6/2025 12:13:09 AM
Share This News:



‘परिवर्तन’च्या निरपेक्ष कार्याने भारावलो – मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार

कौलगे (ता. कागल), राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कौलगे येथील ‘परिवर्तन सामाजिक विकास संस्थे’च्या मुख्यालयाला भेट देऊन संस्थेचे कार्य पाहिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, "परिवर्तनच्या निरपेक्ष आणि सेवाभावी कार्याने मी भारावून गेलो आहे. कोणतीही शासकीय मदत न घेता आणि राजकीय पार्श्वभूमी नसताना ही संस्था गेली १४ वर्षे समाजासाठी कार्य करत आहे, याचे कौतुक वाटते."

ही भेट ह. भ. प. सचिनदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या परिवर्तन संस्थेच्या कामाची माहिती घेण्यासाठी खासपणे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी तब्बल एक तास संस्थेचे कार्य समजून घेतले.

मुश्रीफ पुढे म्हणाले, "वारकरी परंपरेतून प्रेरणा घेत सामाजिक कार्य करणारी ही संस्था आपल्या मतदारसंघात कार्यरत आहे, ही आनंदाची बाब आहे. मी ज्या उद्देशाने राजकारणात आहे, त्याच ध्येयाने ही संस्था कार्य करते आहे." त्यांनी येत्या काळात होणाऱ्या किर्तन महोत्सवात परिवर्तन संस्थेच्या सहभागाची विनंती केली.

ह. भ. प. सचिनदादा पवार म्हणाले, "मंत्री मुश्रीफ हे लोकांमध्ये राहून यशस्वी राजकारण करणाऱ्यांपैकी एक आहेत. वारकरी परंपरेचे कार्य हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक व सांस्कृतिक बळ आहे आणि आम्ही त्यात संपूर्ण सहकार्य करू."

यावेळी सचिनदादा पवार यांचा मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच स्वयंसेवक तानाजी सावरतकर यांनी संस्थेच्या वतीने मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार केला.

🟡 एक खंत...

मंत्री मुश्रीफ म्हणाले, "या संस्थेच्या कार्याकडे तालुक्याच्या लोकप्रतिनिधी म्हणून मला आधीच यायला हवे होते, ही खंत मला नक्कीच आहे. मात्र यापुढे संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील."

 

प्रा. किसन चौगुले, प्रवीणसिंह भोसले, विकासराव पाटील, तानाजी पाटील, जयसिंग पाटील, के. के. पाटील, हणमंत माने, धनाजी पाटील, मारुती काळुगडे, दीपक मुळे, अशोक पाटील, प्रदीप देवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर भोसले यांनी केले आणि आभार अरविंद किल्लेदार यांनी मानले.


‘परिवर्तन’च्या निरपेक्ष कार्याने भारावलो – मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार
Total Views: 119