बातम्या
विशाळगड दंगल प्रकरणातील मुख्य संशयित पडवळला अटक
By nisha patil - 8/28/2025 11:49:00 AM
Share This News:
विशाळगड दंगल प्रकरणातील मुख्य संशयित पडवळला अटक एस.पी. योगेशकुमार गुप्ता यांच्या दक्षतेला यश
शाहूवाडी/कोल्हापूर –
विशाळगड दंगलीतील मुख्य संशयित रवींद्र दिलीप पडवळ (रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तब्बल वर्षभर पसार असलेला पडवळ शाहूवाडी पोलिसांच्या पथकाने पुण्यातून अटक केला. या कारवाईमुळे कोल्हापूर पोलिस दलाची प्रतिमा उंचावली असून, नव्याने पदभार स्वीकारलेले पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या काटेकोर नियोजनाला यश आले आहे.
१५ जुलै २०२५ रोजी विशाळगड पायथ्याशी अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी झालेल्या मोठ्या जमावात दंगल भडकली होती. गजापूर गावात दुकाने, वाहने जाळली गेली होती. या घटनेत पडवळ व संभाजी साळुंखे यांच्यासह शेकडो जणांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र पडवळ त्यानंतर फरार राहिला.
दरम्यान त्याचा एका सार्वजनिक कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांवर टीकेची झोड उठली होती. पण एस.पी. गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चार दिवसांत विशाळगड भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली व शाहूवाडीचे उपअधीक्षक आप्पासो पवार, पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांना ठोस सूचना दिल्या.
त्याच धाग्यावर शाहूवाडी पोलिसांनी गणेशोत्सवाच्या धामधुमीत पुण्यातून पडवळला जेरबंद केले. पडवळला न्यायालयात हजर केले असता ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस आता त्याला आश्रय देणाऱ्यांचा शोध घेत असून, त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
👉 नवीन एस.पी. योगेशकुमार गुप्ता यांनी दाखवलेले कणखर नेतृत्व, काटेकोर नियोजन आणि गुन्हेगारांविरुद्धचा आक्रमक मोर्चा यामुळे पडवळ अटकेला न्याय मिळाला.
विशाळगड दंगल प्रकरणातील मुख्य संशयित पडवळला अटक
|