बातम्या

पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीन दिवस बंद; मूर्तीला पाचव्यांदा वज्रलेप 

Pandharpur s Vitthal Rukmini temple


By nisha patil - 9/23/2026 4:40:30 PM
Share This News:



पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीन दिवस बंद; मूर्तीला पाचव्यांदा वज्रलेप 

विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्यासाठी पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान तीन दिवस दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मुखदर्शनासह पदस्पर्श दर्शनही बंद राहणार आहे. मंगळवारी रात्री शेजारती झाल्यानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धनाच्या कामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे काम करण्यात येत आहे.

या संवर्धनाच्या कामासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे उपअधीक्षक डॉ. एस. विनोद कुमार, राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जतन-संवर्धन कामाचे ठेकेदार प्रतिनिधी तसेच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे यापूर्वी १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या वर्षांत संवर्धन करण्यात आले आहे. मागील संवर्धनाला सुमारे पाच वर्षांचा कालावधी झाल्याने मूर्तीच्या नियमित देखभालीच्या अनुषंगाने यावेळी पुन्हा संरक्षक आवरण अर्थात वज्रलेप देण्यात येणार आहे. ही मूर्ती संवर्धनाची पाचवी प्रक्रिया असणार आहे.संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर २६ सप्टेंबरपासून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन भाविकांसाठी पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. वारकरी, भाविक आणि नागरिकांनी या कालावधीची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी केले आहे.


पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीन दिवस बंद; मूर्तीला पाचव्यांदा वज्रलेप 
Total Views: 14