बातम्या
प्रशासकीय काळातील आर्थिक अनियमिततेच्या चौकशी करिता पन्हाळा नगरपरिषद नगरसेवक उपोषणासाठी
By nisha patil - 9/16/2026 9:47:35 PM
Share This News:
प्रशासकीय काळातील आर्थिक अनियमिततेच्या चौकशी करिता पन्हाळा नगरपरिषद नगरसेवक उपोषणासाठी
गवळी यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ३० सप्टेंबरपर्यंत अहवालाचे आश्वासन, मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाला तात्पुरता स्थगिती
पन्हाळा प्रतिनिधी, शहानवाज मुजावर पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या प्रशासकीय काळात झाल्याचा आरोप असलेल्या कथित आर्थिक अनियमितता व गैरव्यवहाराची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याच्या मागणीला उपनगराध्यक्ष सतीश भोसले यांच्यासह नगरसेविका तेजस्विनी गुरव, समीना गारदी, प्रियांका गवळी ,दिपाली काशीद आणि नगरसेवक शहाबाज मुजावर यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
नगरसेवक प्रदीप प्रभाकर गवळी यांनी नगरपरिषदेतील विविध विकासकामांमध्ये मेजरमेंट बुकमधील नोंदी, प्रत्यक्ष झालेल्या कामाचे प्रमाण, मंजूर अंदाजपत्रक, कामाची बिले आणि अदा झालेली रक्कम यामध्ये तफावत आहे का, याची चौकशी करण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी १६ सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याची पूर्वसूचना दिली होती.
या मागण्यांची प्रशासनाने दखल घेतली असून, मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत परिपूर्ण अहवाल घेण्यात येणार असल्याचे गवळी यांना पत्राद्वारे कळविले आहे. अहवाल प्राप्त होईपर्यंत तसेच विसंगती आढळल्यास संबंधित मक्तेदाराचे देयक अदा केले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, अभियंता किंवा मक्तेदाराची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांनी केली आहे. तसेच नगरपरिषदेच्या सार्वजनिक निधीच्या वापराबाबत पारदर्शकता राहावी आणि चौकशीअंती सत्य जनतेसमोर यावे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. ३० सप्टेंबरपर्यंत सादर होणाऱ्या अहवालाकडे पन्हाळावासीयांचे लक्ष लागले आहे.
प्रशासकीय काळातील आर्थिक अनियमिततेच्या चौकशी करिता पन्हाळा नगरपरिषद नगरसेवक उपोषणासाठी
|