बातम्या
म.न.पा. जिल्हास्तरीय शालेय शासकीय बेसबॉल स्पर्धेत पंत वालावलकर हायस्कूलचे निर्विवाद वर्चस्व ;
By nisha patil - 10/18/2026 12:22:51 PM
Share This News:
म.न.पा. जिल्हास्तरीय शालेय शासकीय बेसबॉल स्पर्धेत पंत वालावलकर हायस्कूलचे निर्विवाद वर्चस्व ;
कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळ संचालित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शांताराम पंत वालावलकर हायस्कूलच्या १४ वर्षाखालील आणि १७ वर्षाखालील मुला - मुलींच्या संघाने पंत वालावलकर हायस्कूलच्या मैदानावरती पार पडलेल्या मनपा शालेय शासकीय जिल्हास्तरीय बेसबॉल स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले . १४ वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये शांतारामपंत वालावलकर हायस्कूलच्या खेळाडूंनी चाटे स्कूलचा ९ - o अशा फरकाने मोठा पराभव करून अजिंक्यपद पटकावले तर १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने माईसाहेब बावडेकर हायस्कूलच्या संघाचा ७ - १ असा दणदणीत पराभव करून अजिंक्यपद पटकावले . १७ वर्षाखालील मुलांच्या गटात शांतारामपंत वालावलकर हायस्कूलने संजीवन इंटरनॅशनल स्कूलचा ९ - २ अशा फरकाने पराभव करून विजेतेपद राखले.
तर १७ वर्षाखालील मुलींच्या गटात शांतारामपंत वालावलकर हायस्कूलने माईसाहेब बावडेकर हायस्कूलचा १२ - २ अशा मोठ्या फरकाने पराभव करून अजिंक्यपद खिशात टाकले . या स्पर्धेसाठी पंच म्हणून विशाल निगडे, अक्षय कदम,दिपाली धनवडे, सिद्धेश माने, श्रीवर्धन बनसोडे, भारत टोणे, शिरीष माने या राज्यस्तरीय पंचांनी निकोप वातावरणात स्पर्धा पार पाडून खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले . शाळेचे राष्ट्रीय क्रीडाप्रशिक्षक राजेंद्र बनसोडे, क्रीडाशिक्षक समीर जमादार, सागर वाडकर यांनी स्पर्धेचे यशस्वी संयोजन केले . वालावलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन केले आणि आपल्या मनोगतात स्पर्धकांनी सांघिक भावना जपून खेळ भावना वाढीस लावावी असे आवाहन केले .
राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांनी स्पर्धक संघाना शिस्तबद्ध प्रदर्शनाचे आवाहन करून स्पर्धेच्या नियमांची अंमल बजावणी करण्याबाबत आवाहन केले .मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांचा सत्कार राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांनी केला . पर्यवेक्षिका सरीता शिंदे तसेच सहभागी शाळांतील मार्गदर्शकांचा सत्कार क्रीडाशिक्षक समीर जमादार यांनी केला . शाळेच्या निर्भेळ यशाबाबत शालेय समितीचे अध्यक्ष संजीवभाई परीख, ज्येष्ठ संचालक एम.एस. पाटोळे यांनी विजेत्या संघाचे क्रीडा प्रशिक्षकांचे आणि मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले . चारही संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
म.न.पा. जिल्हास्तरीय शालेय शासकीय बेसबॉल स्पर्धेत पंत वालावलकर हायस्कूलचे निर्विवाद वर्चस्व ;
|