बातम्या

गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन होण्याचा मार्ग मोकळा! कोर्टाचा मोठा निर्णय!

Path cleared for a Mahayuti


By nisha patil - 9/11/2026 7:46:58 PM
Share This News:



गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन होण्याचा मार्ग मोकळा! कोर्टाचा मोठा निर्णय!

गोकुळ दूध संघाच्या चेअरमन निवडीबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सोमवारी झालेली सुनावणी पूर्ण झाली असून, महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या चार तज्ज्ञ संचालकांच्या अध्यादेशाला न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उद्या, मंगळवार (दि. १० नोव्हेंबर) रोजी होणाऱ्या चेअरमन निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने गोकुळ दूध संघाच्या चेअरमन निवडीला तसेच महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेल्या चार तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले होते.

या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीबाबतच्या शासनाच्या अध्यादेशाला स्थगिती दिली नाही. तसेच चेअरमन निवडीची प्रक्रिया नियमानुसार पार पाडून निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले. मात्र, ही प्रक्रिया आणि निकाल याबाबतची अंतिम सुनावणीच्या अधीन राहूनच निर्णय देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे उद्या होणाऱ्या गोकुळच्या चेअरमन निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, महायुतीकडून चेअरमन निवड होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. मात्र, या प्रकरणातील अंतिम न्यायालयीन निर्णय काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सुनावणीत महायुतीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मुकुल रोहतगी, ॲड. अनिल अंतुरकर आणि ॲड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली. तर समविचारी आघाडीच्या वतीने ॲड. अभिषेक मनु सिंघवी आणि ॲड. श्रीकृष्ण गणबावले यांनी युक्तिवाद केला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ॲड. अश्विनी भिडे, तर महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने ॲड. प्रल्हाद परांजपे यांनी काम पाहिले.


गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन होण्याचा मार्ग मोकळा! कोर्टाचा मोठा निर्णय!
Total Views: 12