बातम्या

ऊसाला ५ हजारांचा दर द्या; अन्यथा बांधावरच ऊस रोखणार!

Pay a rate of ₹5 000 for sugarcane


By nisha patil - 12/9/2026 3:31:25 PM
Share This News:



ऊसाला ५ हजारांचा दर द्या; अन्यथा बांधावरच ऊस रोखणार!............................. 
 

‘आंदोलन अंकुश’चा कारखानदारांना इशारा; गत हंगामातील ३०० रुपयांसाठीही एल्गार...... 
 

शिरोळ, दि. १२ : प्रतिनिधी — आचिन हेरवाडे उसाचा वाढता उत्पादन खर्च, साखर व उपपदार्थांना मिळणारे विक्रमी दर आणि कारखान्यांचा वाढलेला नफा पाहता यंदाच्या उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर देणे कारखानदारांना सहज शक्य आहे. त्यामुळे ५ हजारांचा परवडणारा दर जाहीर केल्याशिवाय उसाला कोयता लावून देणार नाही; गरज पडल्यास ऊस बांधावरच रोखून धरू, असा आक्रमक इशारा ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिला.
 

याशिवाय गत हंगामातील साखर व उपपदार्थांच्या नफ्यात शेतकऱ्यांचा वाटा म्हणून प्रतिटन आणखी ३०० रुपये द्यावेत, या मागणीसाठीही संघटना आक्रमक भूमिका घेणार आहे. ‘आंदोलन अंकुश’च्या पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या बैठकीत यंदाच्या ऊस आंदोलनाची दिशा आणि रणनीती निश्चित करण्यात आली.
चुडमुंगे म्हणाले, शेतकऱ्यांच्या घामातून ऊस पिकतो; मग नफ्याचा मोठा हिस्सा कारखानदारांच्या पदरात आणि उत्पादन खर्चाचा भार शेतकऱ्यांच्या माथी, हे यापुढे चालणार नाही. उसाचा वाढलेला उत्पादन खर्च, मजुरी, खते, औषधे, पाणी आणि वाहतूक खर्च यांचा विचार करता सध्याचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत.

 

साखर आणि उपपदार्थांच्या बाजारभावातून कारखान्यांना मोठा फायदा होत असताना शेतकऱ्यांना मात्र दरासाठी आंदोलन करावे लागते, ही विसंगती आता संपवण्याची वेळ आली आहे. यंदा शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली तर ५ हजारांचा दर मिळवणे शक्य आहे. संघटनेचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याने ऊस तोडणीसाठी घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
 

देशातील उसाची उपलब्धता कमी होत असून साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात साखरेचे दर चांगले राहण्याची शक्यता असून त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे. गतवर्षीच्या आंदोलनामुळे एफआरपीपेक्षा अधिक दर मिळवून घेण्यात यश आले. यंदा त्यापेक्षा मोठी लढाई उभी करून ५ हजारांचा दर पदरात पाडून घेण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
राकेश जगदाळे, दीपक पाटील, उदय होगले, नागेश काळे, कृष्णा देशमुख, बाळासिंग रजपूत यांनी आंदोलनाची भूमिका मांडली.

 

यावेळी संभाजी शिंदे, धनाजी माने, प्रभाकर बंडगर, सचिन हेरवाडे, कामिलबाबा इनामदार, पिंटू ढेकळे, अमोल मोरे, सारंग परीट, अमित पाटील, दत्तात्रय जगदाळे, देवेंद्र चोगुले, भास्कर गावडे, दादामिया जैना, रशीद मुल्ला, प्रकाश पाटील, पप्पू मुंगळे, प्रमोद नाईक, भूषण गंगावणे, अक्षय पाटील, महादेव काळे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील विविध गावांतील तीनशेहून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
‘३०० रुपयां’च्या मागणीला हात उंचावून संमती
गत हंगामात साखर आणि उपपदार्थांच्या वाढलेल्या दरामुळे कारखानदारांना मोठा फायदा झाला आहे. या नफ्यातील शेतकऱ्यांचा वाटा म्हणून गत हंगामात तुटलेल्या उसाला प्रतिटन आणखी ३०० रुपये द्यावेत, असा ठराव बैठकीत मांडण्यात आला. उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी हात उंचावून या ठरावाला एकमताने मान्यता दिली.

 

दर जाहीर न झाल्यास आंदोलनाची धग वाढणार
५ हजार रुपये दर आणि गत हंगामातील ३०० रुपये या दोन प्रमुख मागण्यांवर ‘आंदोलन अंकुश’ आता माघार घेणार नाही. गावागावातील कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना संघटित करून आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्धार केला आहे. कारखानदारांनी शेतकऱ्यांना परवडणारा दर जाहीर केला नाही, तर ऊस तोडणी रोखण्यापासून ते ऊस बांधावरच अडविण्यापर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.


ऊसाला ५ हजारांचा दर द्या; अन्यथा बांधावरच ऊस रोखणार!
Total Views: 8