राजकीय
विविध आवास योजनेतील लाभार्थिंचे हफ्ते वेळेत द्या नाहीतर जनआंदोलन उभे करणार -शिवसेना उबाठाचे निवेदन
By Administrator - 1/15/2026 10:51:16 AM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, आहिल्यादेवी होळकर आवास योजना, अटल बांधकाम आवास योजना, बालकल्याण योजना, रोजगार हमी योजना या विविध योजनेतील थकीत हफ्त्यांचे लवकरात लवकर पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावेत अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयावर शासनाचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढणेत येईल असा इशारा देत आजरा गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
या विविध योजनेतून अनेक लाभार्थीनी आपली घरे बांधकाम सुरवात केली आहेत परंतु शासनाकडून या लाभार्थीना घरांचे दुसरा व तिसरा हफ्ता न आल्याने या गोरगरीब लाभार्थीना सावकारी पद्धतीने 5ते10% नी उसनवार पैसे घेऊन घर बांधकाम सुरु केलेली आहेत. तसेच काही लोक तर बांधकाम सुरु असल्याने जनावरांच्या गोठ्यात तर काहीजण भाड्याने घर घेऊन रहात आहेत. काही लाभार्थिंचे घर बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा हफ्ता न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या गोरगरीब लाभार्थिंचे हफ्ते त्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावेत अन्यथा शिवसेना उबाठातर्फे जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले की, निवडणुकीत घोडेबाजार करण्यासाठी सरकारकडे पैसा उपलब्ध आहे परंतु गोरगरिबांच्या योजनांना देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. बालसंगोपन योजनेतील जे निराधार मुले आहेत या मुलांना महिन्याला 2200/-₹ दिले जातात. परंतु मागील पाच ते सहा महिन्यापासून यांना हफ्ते आलेले नाहीत. या मुलांचे पालनपोषण ही आजी आजोबा किंवा इतर नातेवाईक करतात मग या वृद्ध आजी आजोबानी त्यांचे संगोपन कसे करायचे? असा प्रश्न उपस्थित केला. सरकारच्या या फसव्या धोरणांचा त्यांनी यावेळी निषेध केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शिवाजी आढाव, सुनील डोंगरे, संजय येसादे,रंगा माडभगत, महेश पाटील, बिलालभाई लतीफ, सुयश पाटील, अमित गुरव, सूरज पाटील, किरण पाटील, आदित्य पाटील आदि शिवसैनिक उपस्थित होते.
विविध आवास योजनेतील लाभार्थिंचे हफ्ते वेळेत द्या नाहीतर जनआंदोलन उभे करणार -शिवसेना उबाठाचे निवेदन
|