विशेष बातम्या

शहाजी महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर अग्रणी कार्यशाळा संपन्न

Pioneering workshop on artificial intelligence concluded at Shahaji College


By nisha patil - 1/11/2025 2:28:25 PM
Share This News:



गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण, संशोधन, ग्रंथालयात एआय चा वापर गरजेचा: डॉ.एस.ए.एन.इनामदार
 

शहाजी महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर  अग्रणी कार्यशाळा संपन्न

 

कोल्हापूर:  शिक्षण, संशोधन आणि ग्रंथालयातील गुणवत्ता वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय चा वापर गरजेचा आहे.  एआयच्या साधनांचा, ॲपचा वापर कॅल्क्युलेटर प्रमाणे सोपा आहे. एआयवापराचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रंथपाल आणि वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी ग्रंथपाल डॉ. एस. ए. एन. इनामदार यांनी केले.

शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजना, न्यू कॉलेज क्लस्टर अंतर्गत शहाजी महाविद्यालयातील शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय)शिक्षण संशोधन आणि ग्रंथालयात वापर हा कार्यशाळेचा विषय होता. त्यावेळी  बीज भाषक म्हणून डॉ. इनामदार बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. न्यू कॉलेजचे ग्रंथपाल व अग्रणी कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. आर. पी. आढाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन  मानसिंग बोंद्रे यांचे या कार्यशाळेस मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.डॉ. इनामदार म्हणाले ,वैयक्तिक शिकवणी, स्वयंचलित मूल्यमापन, स्मार्ट कंटेंट निर्मिती, व्हर्च्युअल शिक्षक आणि सहाय्य, भाषांतर आणि संवाद, डेटा विश्लेषण, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एआय साधनांचा उपयोग होतो. 
   

 शिवाजी विद्यापीठातील ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिन पाटील म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा डेटा विश्लेषण, भविष्यवेदासाठी, स्वयंचलित माहिती शोधण्यासाठी, भाषांतर, लेखन सहाय्यक म्हणून वापर होतो. तसेच नवीन शोधासाठी ही एआयचा वापर होतो. एआयचे  काही तोटेही आहेत. वस्तुनिष्ठता नैतिकता व मूल्यांचा वापर करून संशोधन विद्यार्थ्यांनी करावे आणि एआय साधनांचा त्यासाठी वापर करावा. परंतु त्यावर पूर्ण विसंबून राहू नये.
   

भोगावती महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ. प्रशांत कल्लोळी यांनी ग्रंथ शोधताना एआय चा वापर कसा करावा, एखाद्या ग्रंथातील सारांश एआय च्या माध्यमातून कसा पहावा, अनेक ग्रंथांची माहिती एकाच वेळी एआय च्या माध्यमातून कशी शोधावी हे प्रात्यक्षिका आधारे दाखवले. स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांचा अभ्यास करताना एआय चा वापर विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
   शिक्षण व्यवस्थेत एआय चा वापर अपरिहार्य ठरला आहे. विद्यार्थी, प्राध्यापक यांनी   एआय साधनांचा वापर करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.आर.के.शानेदिवाण यांनी यावेळी     केले.         
       

डॉ.आर.पी.अढाव म्हणाले, वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, ग्रंथपाल यांना एखाद्या विषयावरील मंथनासाठी एकत्र येण्याची संधी मिळते. त्यातून नवीन कल्पना, विचार सर्व महाविद्यालयापर्यंत पोहोचण्यास मदत होते. 
 डॉ.पांडुरंग पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सहाय्यक ग्रंथपाल सौ. यु. यु.साळुंखे यांनी आभार मानले .
   

कॉमर्स कॉलेजचे ग्रंथपाल डॉ. तानाजी कांबळे, कमला कॉलेजच्या ग्रंथपाल डॉ. उर्मिला कदम, विवेकानंद  कॉलेजच्या ग्रंथपाल डॉ. नीता पाटील, शाहू कॉलेजचे ग्रंथपाल प्रा. चिखलीकर यांनी मनोगते व्यक्त केली.एआय वापरातील आपले अनुभव विषद केले. सौ. मंजिरी भोसले, सौ.अपर्णा गावडे,सुहास टिपुगडे, गणेश पाटील यांनी  कार्यशाळेचे संयोजन केले. 
     

आय क्यू ए सी समन्वयक डॉ.आर.डी.मांडणीकर,  सह समन्वयक डॉ.ए.बी.बलुगडे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ.के.एम.देसाई, स्टाफ सेक्रेटरी डॉ. दीपक कुमार वळवी, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी ग्रंथपाल यावेळी उपस्थित होते.


शहाजी महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर अग्रणी कार्यशाळा संपन्न
Total Views: 62