बातम्या

आजरा तालुक्यात पुन्हा हत्तीचा उपद्रव

Polgav


By nisha patil - 6/25/2026 11:14:37 AM
Share This News:



**आजरा तालुक्यात पुन्हा हत्तीचा उपद्रव*

**पोळगाव आणि एरंडोळ गावात हत्तीचा धुडगूस*

**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा तालुक्यातील एरंडोळ आणि पोळगाव परिसरात जंगली टस्कर हत्तीचा धुमाकूळ वाढला असून परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.हत्तीने रात्रीच्या वेळी गावाजवळील शेतात प्रवेश करून ट्रॅक्टर, जेसीबी तसेच ऊस पिकाचे नुकसान केले आहे.

ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली अक्षरशः पलटी करून टाकली आहे तर जेसीबीला धक्का मारताना जेसीबीच्या काचेमध्ये सुळे जाऊन काच फुटली आहे.

        हत्तीने रात्रीच्या वेळी पोळगाव शेजारील सोनार नावाच्या शेतात संभाजी नार्वेकर यांच्या राहत्या घरासमोरील ट्रॅक्टरची ट्रॉली उलटवली. ट्रॅक्टरच्या बोनेटवर पाय ठेवून ते चेपवण्याचा प्रयत्न केला, तसेच जवळच उभ्या असलेल्या जेसीबी मशीनला जोरात धडक मारून त्याचे काच फोडले.हत्तीने गेल्या तीन दिवसांत एरंडोळ आणि पोळगाव परिसरातील ८ ते ९ एकर क्षेत्रातील ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे.भीमराव चौगले, राजू होलम आणि दशरथ होलम यांच्या मळा नावाच्या शेतात मागील तीन दिवसापासून ऊसपिकाचे चार ते पाच एकर मधील नुकसान केले आहे.तसेच जीवन शेवाळे यांच्या काजूची झाडे आणि मेसकाठीचे देखील मोठे नुकसान केले आहे.हत्ती हटाव पथक या भागात सतत गस्त घालत असून हत्तीला जंगलात हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. नुकसानग्रस्त भागाची वनपाल संदीप शिंदे, वनरक्षक सुरेख चाळके आणि वनसेवक शंकर डवरी यांनी पाहणी करून नुकसानीचे पंचनामे केले आहेत.

    गावातील लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांना शेतात जाताना भीती वाटू लागली आहे.निसर्गाची आवकृपा, वाढती महागाई, पिकाला हमीभावाचा आभाव आणि परत या वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे बळीराजा चौफेर संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी संघटना आणि शेतकरी करताना दिसत आहेत.


आजरा तालुक्यात पुन्हा हत्तीचा उपद्रव
Total Views: 440