बातम्या

पोलीस नाईक भुजंग कांबळे यांना मानसशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी

Police Naik Bhujang Kamble awarded


By nisha patil - 10/16/2026 3:15:12 PM
Share This News:



पोलीस नाईक भुजंग कांबळे यांना मानसशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी

कर्तव्य बजावत अल्पावधीत संशोधन पूर्ण; पोलीस दलासह समाजातून कौतुकाचा वर्षाव

पन्हाळा प्रतिनिधी  कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस नाईक सध्या पन्हाळगड वायरलेस मध्ये आपले कर्तव्य बजावणारे मा. श्री. भुजंग रामचंद्र कांबळे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून मानसशास्त्र विषयात दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पीएच.डी. (Ph.D.) पदवी संपादन केली. पोलीस दलातील दैनंदिन कर्तव्ये पार पाडत संशोधन पूर्ण करून त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल पोलीस दलासह विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
     

 कांबळे यांनी ‘पोलीस कर्मचाऱ्यांमधील लवचिकता, भावनिक बुद्धिमत्ता, नियंत्रणाचे केंद्र, मानसिक आरोग्य आणि आनंद’ या विषयावर संशोधन केले. पोलीस कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक क्षमता आणि कर्तव्याच्या आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी या दृष्टीने हा संशोधन विषय महत्त्वपूर्ण आहे.
         

 या संशोधनासाठी महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील प्रमुख मार्गदर्शक प्रो. डॉ. भरत नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मानसशास्त्र विषयातील अभ्यास मंडळाचे (BOS) अध्यक्ष प्रो. डॉ. विकास मिणचेकर, प्रो. डॉ. विनायक व्होनमोरे, प्रो. डॉ. घनश्याम कांबळे, प्रो. डॉ. सुरेश संकपाळ आणि प्रो. डॉ. विनोद कांबळे यांचेही सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.
       

याशिवाय पोलीस अधीक्षक निलोत्पल , सहायक फौजदार शैलेंद्र मदने, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र निगडे आणि दीपक पाचवडेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.पोलीस दलातील जबाबदाऱ्या सांभाळत संशोधनासाठी वेळेचे नियोजन करणे, अभ्यासात सातत्य राखणे आणि निर्धारित उद्दिष्ट गाठणे हे आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत पोलीस नाईक भुजंग कांबळे यांनी पीएच.डी. पदवी संपादन करून जिद्द, चिकाटी, मेहनत आणि शैक्षणिक प्रगतीची प्रेरणादायी वाट दाखविली आहे.
       

त्यांच्या या यशामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


पोलीस नाईक भुजंग कांबळे यांना मानसशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी
Total Views: 32